एसटीच्या हलगर्जीपणाचा फटका; ‘तीर्थस्थान’ योजनेतील महिला भाविक ३ तास ताटकळल्या!
कळंब प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या “एसटी संगे तीर्थस्थान” योजनेचा गाजावाजा केला जात असला, तरी कळंब आगारातील नियोजनशून्यता आणि कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे रविवारी (७ जून) महिला भाविकांना तब्बल तीन तास बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कळंब आगारातून नाशिक, शिखर शिंगणापूर, पुरुषोत्तमपुरी, शिर्डी, पंढरपूर आणि अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र, वेळेवर योग्य बसेस उपलब्ध न झाल्याने संपूर्ण व्यवस्थेचा बोजवारा उडाला. परिणामी अनेक बस दोन ते तीन तास उशिराने रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक स्तरावर अशीही चर्चा रंगली आहे की, आगारात काही चालकांची मर्जी सांभाळून त्यांना चांगल्या व नव्या बसेस दिल्या जातात, तर इतर चालकांच्या वाट्याला जुन्या आणि बिघाडग्रस्त बसेस येतात. त्यामुळे चालक-वाहकांना तारेवरची कसरत करावी लागत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
याचबरोबर कळंब आगारात कायमस्वरूपी वाहन परीक्षक नसल्याने कोणाच्या तरी मर्जीतील वाहन परीक्षकाची नियुक्ती करून चालकांची पिळवणूक केली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा चालक वर्गात सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कायमस्वरूपी वाहन परीक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे शिखर शिंगणापूर दर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासून महिला भाविक बसस्थानकात जमल्या होत्या. मात्र, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या जुन्या बसमध्ये बसण्यास महिलांनी नकार दिला. नव्या बसची मागणी करत महिला बसस्थानकाच्या गेटवरच ठिय्या देऊन उभ्या राहिल्या. अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि महिलांसाठी नवीन बसची व्यवस्था करण्यात आली. मात्र तोपर्यंत तीन तासांचा विलंब झाला होता.
भाविकांच्या मते, धार्मिक यात्रेसाठी आलेल्या महिलांना अशा प्रकारे ताटकळत ठेवणे ही एसटी प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या योजनेतच नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
आता या संपूर्ण प्रकाराची आगारप्रमुख दखल घेणार का? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि भाविकांची झालेली गैरसोय भरून काढण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार? याकडे कळंब तालुक्याचे लक्ष लागले आहे.
“भाविकांना दर्शनाची ओढ, पण एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तासन्तास प्रतीक्षा” अशी संतप्त भावना महिला भाविकांमधून व्यक्त होत आहे.