परंडा (प्रतिनिधी)- केळीच्या बागेला आग लागल्याची घटना तालुक्यातील मौजे कंडारी येथे दि.18 मे रोजी दुपारी घडली. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 11 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अंबी पोलीस स्टेशनमधे एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, मौजे कंडारी येथे गट नंबर 156 मध्ये शेतकरी महारूद्र मोरे यांनी केळीची लागवड केली होती. दि.18 मे रोजी दुपारी केळीच्या बागेतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परिसरातील लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. या प्रसंगी अग्निशामक दलाच्या गाडीला बोलावण्यात आले. या घटनेत केळीचे पीक व ठिबक सिंचन असे एकूण 11 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान या प्रकरणी अंबी पोलीस स्टेशनमधे शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.
