धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्ह्याने केवळ उद्दिष्ट पूर्ण केले नाही, तर सलग चौथ्या वर्षी 100 टक्क्यांहून अधिक कामगिरी करणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा होण्याचा मान पटकावला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयामुळे धाराशिवने हे यशशिखर गाठले आहे.
चालू आर्थिक वर्षात धाराशिव जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल 1007 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्याने 129 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकिंग क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जिल्ह्यातील नवउद्योजकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या यशात जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, तेरणा जनसेवा केंद्राची टीम, प्रा. किरण आवटे आणि प्रमोद सुतार यांनी सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी तेरणा जनसेवा केंद्राच्या माध्यमातून मागील चार वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे, 2025-26 या वर्षात 800 चे लक्ष्य निर्धारित असतानाही तब्बल 1007 प्रकरणे मंजूर करून घेण्यात केंद्राला यश आले आहे. ज्यांना स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा सामान्य नागरिकांसाठी तेरणा जनसेवा केंद्र एक भक्कम आधारवड ठरले आहे. या प्रयत्नांमुळेच चार वर्षात 3,100 उद्योजक स्वतःच्या कुटुंबाची गुजरान या उद्योगावर करीत आहेत. जिल्ह्याने सलग चार वर्षे ही सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक नकाशावर धाराशिवचे नाव आता ठळकपणे उमटले आहे.
औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी कटिबद्ध
धाराशिव जिल्ह्याचे हे यश देदीप्यमान आहे. प्रशासनातील सर्व विभाग आणि बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच आपण नवउद्योजकांना बळ देऊ शकलो. भविष्यातही जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
