तेर (प्रतिनिधी)-  मराठवाड्यातील केसर आंबा बागांना हवामान अस्थिरतेचा मोठा फटका बसल्यामुळे यावर्षीआंबा उत्पादनात 40-50 टक्के घट येणार असल्याचे प्रतिपादन केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ संजय पाटील यांनी केले.

कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यातील विजोरा (ता. वाशी), रत्नपुर, हासेगाव ( ता. कळंब), वाणेवाडी (ता. धाराशिव), वरवंटी, अपसिंग्गा (ता. तुळजापूर) आदी ठिकाणी आंबा बागांना भेटी देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम बरवे (वाशी), बी एच सरडे (कळंब),अण्णासाहेब देशमुख (तुळजापूर),ए एस दिवाने ( धाराशिव),वरिष्ठ संशोधक सहायक ओंकार पाटील,उपकृषी अधिकारी जाधव,तीर्थकार,वाडकर तर आंबा उत्पादक अच्युत जाधवर,अमर चोंदे,रवींद्र तोडकर,संजय भागवत,वैभव उंबरे,शंकर देशमुख,विलास म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.या पाहणीबाबत बोलताना डॉ पाटील म्हणाले,यावर्षी आंबा मोहर एक महिना उशिराने आला,मोहर येण्याच्या काळात कडाक्याची थंडी पडल्याने मोठ्या प्रमाणात आंबा झाडे सर्वत्र मोहराने लदगदुन गेली होती, परंतु ही थंडी दीर्घकाळ राहिल्याने फुलाचे रूपांतर फळात होण्याच्या स्थितीत तापमान कमीच राहिले, पर्यायाने फळधारणा कमीच झाली अन थंडीमुळे मोहराचे दांडे लांबलचक पडून यात नर फुलांचे प्रमाण अधिक राहिले. काही प्रमाणात फळधारणा झाली होती परंतु मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस ,वारा- वादळ, काही ठिकाणी गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा फळांची गळ झाली परिणामी फळाच्या राजास मोठा धोका बसला. आंबा पिकास नैसर्गिक धोके भरपूर असल्याने कोणतीही फळबाग लागवड करण्यापूर्वी  बांधावर वारा रोधकाची लागवड करणे अनिवार्य वाटते. सद्यस्थितीत शिल्लक असलेल्या फळांची गळ थांबविणेसाठी प्रयत्न करावा. 


 
Top