उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मुळज येथील जटाशंकर देवस्थान यात्रेनिमित्त आज बुधवारी, दि 01 एप्रिल रोजी जटाशंकर संगीत महोत्सव तर उद्या सकाळी मानाची काठी व श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात्रा महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील मुळज येथे गावच्या पूर्वेला एक किमी अंतरावर उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तम नमुना असलेले प्राचीन हेमाडपंती जटाशंकर मंदिर आहे. प्राचीन काळापासून दरवर्षी जटाशंकर देवस्थानची यात्रा गुढीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत चालते. गुढी पाडव्याला सोयराप्पा घराण्याच्या काठी प्रतिष्ठापणेने यात्रेची सुरुवात होते. मंगळवारी, (दि 31) रात्री उशिरा ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिश बाजी श्री च्या पालखीचे देवस्थानकडे प्रस्थान झाले. आज बुधवारी संगीत महोत्सव, हरीजागर तर उद्या गुरुवारी, (दि 02) पहाटे छबिना मिरवणूक, सकाळी जटाशंकर देवस्थानची तीस ते चाळीस फुट उंच मानाची काठी व श्री च्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यादरम्यान ठराविक ठिकाणी दहीहंडी काला, भारूड आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. यात्रेनिमीत्त मंदिराच्या संपूर्ण गाभार्यात विविध फळे, देशी, विदेशी सुगंधी सुंदर फुलानी मनमोहक आरास करण्यात आली आहे. तर मंदिर व परिसर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि 03) सकाळी मोफत आरोग्य, रक्त तपासणी व रक्तदान शिबिर, दुपारी देवस्थान परिसरात जंगी कुस्ती फडाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्या मल्लांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. शनिवारी पहाटे महाआरती व प्रसाद वाटपाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा महोत्सवातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वरयात्रा, एक सुरेल संगीत मैफील!
जटाशंकर देवस्थान यात्रेनिमित्त आज बुधवारी, (दि 01) रात्री मंदिर परिसरात यावर्षीच्या जटाशंकर संगीत महोत्सवात आसावरी मुळे निर्मित पुणे येथील प्रसिद्ध गायक संगीतकार खंडेराव मुळे यांच्या स्वरयात्रा एक सुरेल संगीत मैफली चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
