तुळजापुर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांच्या वाढत्या तक्रारींना आता संघटनात्मक पातळीवरून आवाज मिळू लागला आहे. कार्यालयातील अनियमितता, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि नागरिकांच्या कामांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे संतापाची लाट उसळत आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर स्वतः गणेश पाटील यांची स्वाक्षरी असून, कार्यालयातील सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे काही अधिकारी व कर्मचारी दीर्घकाळ मुख्यालयी राहत नसल्यामुळे कामकाज ठप्प होत आहे. नागरिकांना साध्या कामासाठीही अनेक वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, मात्र अपेक्षित सेवा मिळत नसल्याने प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला आहे.
ही बाब केवळ तक्रारींपुरती मर्यादित नसून, प्रत्यक्षात नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित कामे, नोंदी, उतारे आदी महत्त्वाच्या प्रक्रियांना विलंब होत असून, त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, संबंधित कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत माहिती असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. यामुळे “शासकीय शिस्तीचे धाबे दणाणले आहेत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, गणेश पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एकूणच, तुळजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रश्न आता गंभीर बनला असून, प्रशासनाने वेळ न दवडता ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा आक्रोश रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.