धाराशिव (प्रतिनिधी)- मराठी भाषा गौरवदिन आणि कुसुमाग्रज जयंतीचे औचित्य साधून धाराशिव शहरातील अक्षरवेल महिला साहित्य मंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विशाखा साहित्य संमेलनाचे शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध लेखक, चारोळीकार, कथा कादंबरीकार चंद्रशेखर गोखले, अभिनेत्री, गायिका उमा गोखले तसेच अपूर्वाई प्रकाशन पूणेचे डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे पहिले सत्र पुस्तक प्रकाशनाने तर दुसरे सत्र काव्य संमेलनाने रंगले. 

कार्यक्रमाची सुरुवात  संमेलनाध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बार्शी नाका येथील राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ग्रंथदिंडीने झाली. ग्रंथदिंडीमध्ये रेखा खैरे यांच्या यशराज पब्लिक स्कूलच्या लेझीम पथकासह  मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या वारकरी मुला मुलींच्या समूहाने सहभाग नोंदवला. श्रीअनिल ढगे यांच्या  मृदुंगाच्या तालात ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला . ग्रंथदिंडीमध्ये ज्ञानदेव,तुकाराम यांची वेशभूषा साकारलेली लहान लहान मुलं देखील होती. विद्येची देवता सरस्वतीची वेशभूषा  केलेल्या अक्षरवेल मंडळाच्या सदस्य अँड. जयश्री तेरकर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पाहुण्यांचे स्वागत औक्षण आणि पुष्पवृष्टी ने करण्यात आले प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलना नंतर सह्याद्री डान्स अकॅडमीच्या श्रावणी व्यास यांच्या बालचमुने सरस्वती वंदना सादर करून श्रोत्यांची मने जिंकली .मोक्षा करवर हिच्या सुंदर आवाजातील संमेलन गीताने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर गोखले यांचा परिचय मंडळाच्या उपाध्यक्ष प्रा. विद्या देशमुख यांनी तर उमा गोखले यांचा परिचय डॉ.अस्मिता बुरगुटे यांनी व प्रकाशक डॉ.रवींद्र चिंचोलकर यांचा परिचय शिवनंदा माळी यांनी करून दिला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षरवेलच्या अध्यक्ष डॉ.सुलभा देशमुख यांनी केले कार्याध्यक्ष कमल नलावडे यांनी मंडळाची माहिती तर संस्थापक अध्यक्ष डॉ. रेखा ढगे यांनी चारोळी संग्रह प्रकाशनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. मार्गदर्शक डॉ. अनार साळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात जब्राट या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या प्रगती कोळगे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण उमा चंद्रशेखर गोखले यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या सर्वांचं करता करता आपण आपल्या आनंदासाठी ही जगलं पाहिजे. स्वतःला खुश ठेवण्याची जबाबदारी आपली स्वतःची असते ती प्रामाणिकपणे पार पाडली तरच खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य सार्थ होईल तसेच त्यांनी आपल्या मधुर आवाजात वैकुंठीचा राणा तु ची नारायण ......हे गीत गायले .त्यांच्या पेपर वाल्या मुलांच्या गोष्टीने श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी तरले. सहजरीत्या त्यांनी श्रोत्यांशी आपली नाळ जोडून आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टींवर देखील दिलखुलास गप्पा मारल्या.

संमेलनाचे अध्यक्ष चंद्रशेखर गोखले आपल्या बालपणीच्या आठवणी आणि आजूबाजूचा परिसर तसेच त्यांना उपजत मिळालेले कवितेचे वरदान यावर मनमोकळेपणाने  बोलले . आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली ती म्हणजे हरवत चाललेल्या कुटुंबातील संवादाची!पालकांनी आपल्या पाल्यासोबत अत्यंत निखळ नाते जोडावे त्यांना प्रोत्साहन द्यावे असाही सल्ला त्यांनी दिला शेवटी त्यांच्या उत्तम उत्तम चारोळ्या ऐकल्या. सरांच्या चारोळ्या ऐकून श्रोतावर्ग दाद देत होता माना डोलवत होता.

अपूर्वाई प्रकाशनचे प्रकाशक डॉ.रवींद्र चिंचोलकर यांनी  त्यांचा प्रकाशक होण्याचा प्रवास आणि अक्षरवेलशी असलेले नाते तसेच चारोळी संग्रह प्रकाशित करताना आलेल्या अनुभवातील गमती जमती सांगितल्या. वैद्य पल्लवी कोथळकर यांनी वाचक  मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात प्रथम कमल नलावडे यांच्या कवी, चित्रकार राजेंद्र अत्रे यांचे मुखपृष्ठ असलेल्या, डॉ. सुलभा देशमुख यांची पाठराखण असलेल्या व अपूर्वाई प्रकाशन पूणे चे डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी प्रकाशित केलेल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे थाटात प्रकाशन झाले.

अत्यंत उत्साहावर्धक  वातावरणात फुलांची नावे असलेल्या 42 चारोळी संग्रहाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते पार पडले यात क्रमश:1) डॉ. सुलभा देशमुख - प्राजक्त 2) कमल नलावडे -कृष्णकमळ 3) विमल नवाडे -कुंदकळ्या 4)डॉ. अनार साळुंके -रातराणी 5)डॉ. रेखा ढगे -सदाफुली 6)प्रा. विद्या देशमुख -अनंत 7) डॉ. अस्मिता बुरगुटे- पलाश 8)शिवनंदा माळी -गुलमोहर 9)अनिता पडवळ -गुलबक्षी, ऋतुगंध 10) अर्चना गोरे -अबोली 11)अमृता अमोल- जुई 12)जना फासे- बकुळ 13)सुनीता देशपांडे- निशिगंध 14) ज्योति कावरे- चाफा 15)वैजयंती तावडे- वैजयंती 16)अलका तावडे- गजरा 17)मनीषा पुंड- कृष्ण सखी 18)सविता गुंड - शब्दफुले 19) रेखा मगर- केतकी 20)ज्योती खापरे -पुष्प वर्षा 21)पूजा पाटील -शब्दसरी 22) डॉ.मनीषा असोरे- अपराजिता 23)अश्विनी निवर्गी- शाल्मली 24)अपर्णा कुलकर्णी-  कार्वी 25)मैनाताई साबणे- जास्वंद 26)स्मिता पेशवे- शब्दगंध 27) संजीवनी कुलकर्णी -जीवनपुष्प 28) अर्चना देशमुख -कुमुदिनी 29) सुमित्रा आटपळकर -मोगरा 30) कांचनगंगा मोरे -कृष्ण मंजिरी 31) लता वाघचौरे- सायली 32)कविता पुदाले- ताम्हण 33) योगिता सुरवसे देवकळी 34)सविता माळी- केवडा 35)मंजुश्री भुतेकर- मंजिरी 36)उषा देशमुख- गुलाब 37)सारिका देशमुख - कदंब 38) विद्या डोईफोडे- कुमुद 39) किरण देशमाने -अक्षरपद्म  40) नंदा देवडीकर -मधुमालती 41 )जयश्री जगदाळे - नीलकमल. 42 ) मनिषा अपसिंगेकर -मन प्राजक्त

अशा विक्रमी संख्येने चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले. पहिल्या सत्राचे खुमासदार असे सूत्रसंचालन सुनीता गुंजाळ कवडे व किरण देशमाने यांनी केले.

भोजन विरामानंतर दुपारचे सत्र काव्य संमेलनाने रंगले. काव्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान विमल नवाडे यांनी भूषविले.रोहिणी तळेकर यांनी आपल्या सुरेल आवाजात सरस्वती स्तवन गायले.अंजली देशपांडे ,बी. सुरभी, मनीषा पोतदार, गिरिजा खैरे, अलका पवार, प्रिया उमरकर ,वैशाली अघोर ,अरुणा जाधव ,सायली वेदालंकार, सिद्धी सुरवसे ,सविता जाधव, रजनी रावळे ,प्रणिता राठोड, श्रुतिका हाजगुडे, पुनम तापडिया, लक्ष्मी देशपांडे यांनी आपल्या रचना सादर केल्या तर पी.एस.आय.अनघा गोडगे यांनी सकाळी ग्रंथदिंडीचा बंदोबस्त आणि दुपारी काव्य संमेलनात सहभाग घेऊन कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले आणि आपली एक वास्तववादी रचना सादर केली.दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन अँड .स्वप्नाली अत्रे आणि जयश्री फुटाणे यांनी केले . आभार स्मिता पेशवे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले . अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर, साहित्यिक, कवी, मसापचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


 
Top