धाराशिव (प्रतिनिधी)-  राजकीय क्षेत्रात धर्म आला की लोकशाहीचे अवमूल्यन होते असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ राजकीय अभ्यासक डॉ मोईन शाकीर व्याख्यानमालेचे दि.9 फेब्रुवारी 2026 रोजी तिन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. रमेश चौगुले, संचालक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर,उपपरिसर धाराशिव यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.महादेव गव्हाणे म्हणाले की, डॉ मोईन शाकीर यांनी आयुष्यभर लोकशाहीचे मूल्य जपण्याचे कार्य केले. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण आपल्या विचारांतुन समाजास दिली. त्यांच्या मते धर्म व विज्ञान यांचा समन्वय साधण्याची आज खूप आवश्यक आहे. तर द्वितीय सत्रात डॉ महेशकुमार मोटे, श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरुम यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्म मिळाला ही बाब महत्त्वाची नसुन तो कसा जगला हे महत्त्वाचे आहे. डॉ शाकीर हे लोकशाहीचे खंदे समर्थक होते.  

तर तृतीय सत्रामध्ये डॉ. आनंद करडे यांनी हमीद दलवाई, डॉ असगर अली, डॉ मौलाना आझाद यांचे कार्य भारतीयांना विसरता येणार नाही. डॉ मोईन शाकीर हे एक शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांशी जोडले गेले होते असे सांगितले. अध्यक्षीय समापन प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले. सदर व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी डॉ. दत्तात्रय साखरे, डॉ बालाजी गुंड, डॉ. मंगेश भोसले यांच्या सह सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला. सदर प्रसंगी तिन्ही सत्रांचे सूत्रसंचालन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले. आभार डॉ. गुंड यांनी मानले. 


 
Top