धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील मौजे दाऊदपूर येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत “जल अर्पण” दिवस मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम भालके,धाराशिवचे गट विकास अधिकारी कांबळे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) जि.प. धाराशिव, सुनील काटकर, कार्यकारी अभियंता (म.जि.प.) हेमंत नागदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व उपअभियंते तसेच कनिष्ठ अभियंते, जिल्ह्यातील सर्व शाखांचे अभियंते व टाटा अभियंते तसेच दास्तपूर गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात योजनेच्या पायाभूत विहिरीजवळ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन करून करण्यात आली. त्यानंतर जि.प.प्रशालेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींसह मुख्य रस्त्यावरून अभंगाचे गीत गात प्रभातफेरी काढण्यात आली.पुढे ही फेरी जि.प.आरोग्य केंद्राच्या प्रांगणात पोहोचली व कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

योजनेची प्रस्तावना व उद्दिष्टे कनिष्ठ अभियंता श्रीमती.अश्विनी साळवे यांनी स्पष्ट केली.या योजनेअंतर्गत 8 मीटर व्यासाची पायाभूत विहीर,आयव्ही विहीर,पंपिंग मशिनरी,क्लोरीन यंत्रणा, 795 मीटर उर्ध्ववाहिनी नलिका,3130 मीटर वितरण नलिका,125 घरगुती नळजोडण्या तसेच योजनेची माहिती दर्शविणारा नामफलक उभारण्यात आला आहे.योजनेची सर्व उपांगे पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेऊन योजना कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.तसेच गावातील पाणी व स्वच्छता समितीतील 5 महिलांना पाणी गुणवत्ता तपासणीबाबत  किटचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कटकधोंड (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा) यांनी योजनेबाबत मार्गदर्शन करताना योजना हस्तांतरणानंतर तिची देखभाल ही सर्व ग्रामस्थांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. पाण्याचा योग्य वापर करून संसाधन जपण्याचे आवाहन त्यांनी केले.गट विकास अधिकारी यांनीही योजना पूर्ण झाल्यामुळे गावकऱ्यांची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली असून पाण्याचा जपून वापर करावा,असे मार्गदर्शन केले.

ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संपूर्ण ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच उपअभियंता श्री.स्वप्नील सुंदे आणि संबंधित कनिष्ठ अभियंता यांचे योजना गुणवत्तापूर्ण पूर्ण केल्याबद्दल आभार मानले.कार्यक्रमाच्या शेवटी गावच्या सरपंचांनी योजनेची माहिती देत भविष्यात योजनेची योग्य देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल,असे आश्वासन दिले.योजना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे जाहीर करून उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 
Top