धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील मौजे महाळंगी येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेनिमित्त जल अर्पण दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.तुकाराम भालके,गट विकास अधिकारी श्री.कांबळे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) श्री.सुनील कटकधोंड ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व वाप्कोस उपअभियंते व शाखा अभियंते,जिल्ह्यातील सर्व संबंधित अभियंते,तसेच महालंगी गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांच्या हस्ते कलश पूजनाने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या सहभागातून गावातील मुख्य रस्त्यावर प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी ‘जल जीवन मिशन’चे महत्त्व,“हर घर नल से जल” या घोषवाक्याचा प्रसार करण्यात आला.
शाळेच्या प्रांगणातील कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून योजनेची माहिती सादर करण्यात आली.कनिष्ठ अभियंता श्रीमती श्रीमती.पवार यांनी योजनेचे उद्दिष्ट व कामांचा आढावा मांडला.योजनेअंतर्गत 8 मीटर व्यासाची पाझर विहीर,विंधन विहीर,पंपिंग यंत्रणा, 2742 मीटर उचल नळिका,35 हजार लिटर क्षमतेची उंच जलकुंभ टाकी,2568 मीटर वितरण नलिका व 92 घरगुती नळजोडण्या पूर्ण करण्यात आल्या.तसेच योजनेची माहिती दर्शविणारे नामफलक व सर्व उपांगांची कामे पूर्ण करून चाचणी घेतल्यानंतर योजना कार्यान्वित करण्यात आली.गावातील पाणी व स्वच्छता समितीतील पाच महिलांना पाणी गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी एफटीके किटचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांनी योजनेचे हस्तांतरण ग्रामस्थांकडे करताना, योजनेची देखभाल ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.सन 2053 सालापर्यंतचा लोकसंख्येचा विचार करून योजना राबविण्यात आली असून पाण्याची शाश्वतता टिकवण्यासाठी जलसंवर्धनावर भर देण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.तसेच गट विकास अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल संबंधित अधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी सरपंचांनी योजनेची योग्य देखभाल व दुरुस्तीचे आश्वासन देत उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.