धाराशिव (प्रतिनिधी)- तरुणांनी आपली संस्कृती, परंपरा जाणून घेण्यासाठी घराच्या बाहेर पडावे. शिव छत्रपतींचा इतिहास काय आहे, हे प्रत्यक्ष गड किल्ले पाहिल्यानंतर लक्षात येते. व्यसनाधीनता कमी करुन अभ्यासक बनावे असा अनमोल संदेश इतिहास अभ्यासक जयराज खोचरे यावेळी दिला.
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इतिहास अभ्यासक जयराज खोचरे यांचे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेले मराठा लष्करी भूप्रदेश या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचा राजगड किल्ला, तोरणा किल्ला, प्रतापगड किल्ला, आणि सिंहगड किल्ला यांसारख्या ऐतिहासिक दुर्गांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, युद्धनीती आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा हा मोठा गौरव मानला जात आहे. तज्ञांच्या मते, या किल्ल्यांची रचना, डोंगरदऱ्यांमधील बांधकामशैली, जलव्यवस्था आणि संरक्षणव्यवस्था यामुळे हे दुर्ग जागतिक स्तरावर अद्वितीय ठरतात. या मान्यतेमुळे पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक रोजगाराच्या संधीही वाढतील.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. बालाजी गुंड यांनी केले. या प्रसंगी डॉ. सी. आर. दापके, डॉ.मंगेश भोसले, डॉ. स्वाती जाधव, डॉ.केशव क्षीरसागर, प्रा. माधव उगिले, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. वैशाली बोबडे यांच्या सह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार इतिहास विभागाचे डॉ. विकास सरनाईक यांनी मानले.
