धाराशिव (प्रतिनिधी)- अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने धारशिव तालुक्यात मोठी कारवाई करत अफूच्या अवैध लागवडीचा पर्दाफाश केला असून, तब्बल 12 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धाराशिव तालुक्यातील खेड येथे ही कारवाई करण्यात आली. यात 4 शेतकरी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील खेड या गावात काही शेतकरी गांजा लागवड करीत असल्याचे कळाले. त्यानुसार छापा टाकला. शेत जमिनीत अफूची झाडे अवैधरित्या लागवड करून त्यांची देखभाल व रखवाली करण्यात येत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी शेतकरी लिंबराज पाडुरंग लोमटे, रामहारी नामदेव लोमटे, नरहरी गोविंद लोमटे व ज्ञानेश्वर वसुदेव टकले यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी कायदेशीर पंचनामा करून फुल व बोंड्यासह एकूण 83 किलो अफूची लहान-मोठी झाडे उपटून जप्त केली. या प्रकरणी पोलिस ठाणे ढोकी येथे अंमली पदार्थ विरोध टास्क फोर्सचे सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमान पुरके यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8 (क) व 18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलिस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलिस अूीक्षक अजित टिके व निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सपोनि दिपाली पाटील, सपोउपनि वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रविंद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, हरीचंद्र मुंढे, अमितसिंग ठाकूर, अतुल तुपे, आम्रपाली सुर्यवंशी, ज्योती किर्तीकर, प्रियंका पवार यांनी केली आहे.
