धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि या कारखान्याने व्दितीय गळीत हंगामात आजवर 1 लाख मे.टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून ऊसबिलही वेळेत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. अतिवृष्टी, पूर अशा नैसर्गिक संकटावर मात करून गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे. यावर्षीच्या गळीत हंगामातील आठव्या पंधरवाड्यात 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत आलेल्या ऊसाचे बिल सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली.

एनव्हीपी शुगरला यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे गळीत हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अतिवृष्टीमुळे ऊसफडात वाहने घेवून जाणे आणि तोडणी करताना अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. या सर्व अडचणींवर मात करत कुशल नियोजन करून गाळप हंगामाला सुरूवात केली. यावर्षीच्या हंगामात आजपर्यंत 1 लाख मे.टन गाळपाचा टप्पा कारखान्याच्या व्यवस्थापनातील प्रत्येकाने अहोरात्र परिश्रम करून यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक, सभासद, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार, तोडणी यंत्र ठेकेदार, तोडणी मजूर आणि सर्व सहकार्‍यांचे आभार व्यक्त केले.

आठव्या पंधरवाड्यात 01 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीतीत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकर्‍यांचे ऊसाचे बिल 2700 रुपयाप्रमाणे दि.16 फेब्रुवारी रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकर्‍यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. व ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकर्‍यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहनही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

 
Top