धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कणा मानले जाणारे सिग्नल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले हे सिग्नल पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली सुरू करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. शहरातील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (सेंट्रल बिल्डिंग) चौक, जिल्हा न्यायालय समोरील लहुजी वस्ताद साळवे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहर पोलिस स्टेशन शेजारील संत गाडगेबाबा महाराज चौक आणि जिजाऊ चौक (बार्शी नाका) या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र हे सिग्नल सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, आजतागायत एकदाही नियमितपणे कार्यान्वित झालेले नाहीत.

प्रशासनाकडून लाखो रुपयांचा खर्च करून हे सिग्नल बसविण्यात आले. मात्र वारंवार दुरुस्तीचे काम, निविदांची प्रक्रिया आणि नव्याने कंत्राटदार नेमण्याची पद्धत सुरुच आहे. दर चार, सहा महिन्यांनी किंवा वर्षाखाली सिग्नल दुरुस्तीच्या नावाखाली निविदा काढली जाते, काम सुरू होते; पण सिग्नल मात्र बंदच राहतात.

नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या, वृत्त माध्यमांतून प्रश्न उपस्थित केले, परंतु प्रशासनाकडून केवळ “दुरुस्ती सुरू आहे” एवढाच प्रतिसाद मिळत आहे. “प्रशासन निविदा काढून नेमकं करतंय तरी काय?” असा सवाल उपस्थित होत आहे.

सत्ताधारी व विरोधक दोघेही या विषयावर मौन बाळगून आहेत. ज्या ठिकाणी राजकीय किंवा आर्थिक स्वार्थ नसतो, तेथे प्रशासनाविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. परिणामी शहरातील नागरिकांना वाहतुकीतील गोंधळ आणि अपघाताचा धोका सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सिग्नल दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. मात्र हे केवळ दुरुस्तीपुरतेच आहे का, की या वेळी सिग्नल खरोखरच सुरू होणार आहेत. याचे उत्तर फक्त प्रशासनच देऊ शकते.

 
Top