मुंबई(प्रतिनिधी)-मूलभूत गरज बनलेल्या वीजक्षेत्रामध्ये महावितरण अभियंत्यांच्या कामगिरीचा उज्ज्वल व ऐतिहासिक वारसा आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासह अंधारलेल्या वाटा, घरे प्रकाशाने उजळण्याचे भाग्य महावितरणचे अभियंत्यांना मिळाले आहे. वीजजोडणीद्वारे विजेचा लखलखाट झाल्यावर घरगुती, शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व इतर ग्राहकांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला सुरवात होते. या सेवेचा ग्राहकांना जो आनंद व समाधान मिळतो तोच खरा परमार्थ आहे आणि ग्राहकांना कायम समाधान देणारी सेवा देणे आपले कर्तव्य आहे असे मार्गदर्शन महावितरणच्या संचालकांनी मनोगतांमधून केले.
भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्ताने महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात गुरुवारी (दि. १८) राष्ट्रीय अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संचालक श्री. सचिन तालेवार (प्रकल्प/संचालन), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन), सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे (कोकण विभाग), कार्यकारी संचालक सर्वश्री प्रसाद रेशमे, धनजंय औंढेकर, परेश भागवत, भुजंग खंदारे, दत्तात्रेय पडळकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
संचालक श्री. सचिन तालेवार म्हणाले, महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी डोंगरदऱ्या, अतिदुर्गम भागात वीजयंत्रणा उभारून राज्याच्या प्रगतीला वेग दिला आहे. वीजग्राहकांशी प्रकाशाचे नाते जोडले आहे. हे नाते ग्राहकसेवेतून भक्कम व अतूट राहावे यासाठी सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेने अभियंता म्हणून कार्यरत राहावे.
संचालक श्री. राजेंद्र पवार म्हणाले, कोणत्याही व्यक्तीचा किंवा प्रदेशाचा सामाजिक व आर्थिक विकास हा विजेअभावी शक्य नाही. वीज क्षेत्र अनन्यसाधारण महत्वाचे आहे. या क्षेत्रात काम करताना कंपनीहित व ग्राहकहितासाठी योगदान देत राहणे, ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अत्यंत प्रतिकूल व खडतर परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचारी वीज सेवा देण्यासाठी ज्या धैर्याने, गतीने, सांघिकतेने काम करतात त्याचाही राज्यात नावलौकिक आहे.
सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे म्हणाले, अभियंत्याचा वारसा हा प्राचीन काळातील विश्वकर्मा यांच्यापासून ते डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्यापर्यंतचा आहे. नव तंत्रज्ञानातून हा वारसा सध्याच्या अभियंता पिढीकडूनही आणखी समृद्ध होत आहे. यावेळी कार्यकारी संचालक सर्वश्री प्रसाद रेशमे, धनजंय औंढेकर, परेश भागवत, भुजंग खंदारे, दत्तात्रेय पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले. कार्यक्रमाला क्षेत्रीय मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते तसेच मुख्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.