धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील कोळी-महादेव, मल्हार-कोळी जमाती आरक्षणापासून वंचित आहे. त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. प्रमाणपत्र सुलभ पध्दतीने देण्यात यावे व मराठवाड्यातील आदिवासी कोळी-महादेव, कोळी-मल्हार जमातीसाठी हैद्राबाद गॅझेट लागू करावे, अशी मागणी मराठवाडा सकल आदिवासी कोळी-महादेव संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यात महादेव-कोळी आणि मल्हार-कोळी या दोन जमाती आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला नुकतेच हैद्राबादचे गॅझेट लागू केले आहे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मराठवाड्यातील कोळी-महादेव व मल्हार-कोळी या समाजाकडून हेद्राबाद गॅझेट लागू करण्याची मागणी होत आहे. मुळात तत्कालीन निजाम राजवटीतील मराठवाड्याच्या बालाघाट, महादेव, अजिंठा डोंगररांगा क्षेत्रात दोन्ही जमाती वास्तव्यास आहेत. छत्रपती संभाजीनगरसह आठ जिल्ह्यांसाठी दोन जात पडताळणी समित्या आहेत. रक्तनात्यात वडिलांची, काकांची, आत्याची, भावाची, चुलतभाऊ यापैकी वैधता झाली असेल तर अशा प्रकरणात पुन्हा गृहचौकशीची गरज नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तरीही सर्रासपणे या दोन्ही जात पडताळणी समितीकडून जात पडताळणीचे प्रस्ताव अवैध ठरवली जात आहे. ही अन्यायकारक पध्दत बंद करून जात वैधता देण्यात यावी, हैद्राबाद गॅझेट लागू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मराठवाडा सकल आदिवासी कोळी महादेव संघटनेचे सिध्देश्वर कोळी व पंढरीनाथ कोणे यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


 
Top