भूम (प्रतिनिधी)-  दि. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने भूम तालुक्यातील साबळेवाडी येथील पाझर तलाव फुटल्याने साबळेवाडी व भोनगिरी येथील 10 ते 15 एकर जमिनीवरील माती खरडून गेली आहे. तर 50 हेक्टर पर्यत पिकाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक अंदाजीत माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आली.

ता . 19 रोजी सकाळी तहसीलदार जयवंत पाटील, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मणिक देशमुख, बी. एम. वीर, उप विभगीय अभियंता चंद्रकांत पाटील, विनोद पाटील ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाटील, महाराष्ट्र अधिकारी बी. एम. कोळी, कृषी सहाय्यक पवार, सुरवसे यांनी तलावाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार यांनी सर्व विभागाला दिले आहेत.

साबळेवाडी येथील पाझर तलाव फुटल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हा तलाव फुटल्यामुळे गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी. अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.


 
Top