धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरूवर्य के. टी. पाटील फौंडेशन वर्ग व गुरूवर्य के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आठवी ते दहावी या गटात छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील संघरत्न सुभाष नगदे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे बुधवार, 10 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या वर्गातील विद्यार्थी संघरत्न सुभाष नगदे याने धान्याची स्वच्छता करण्याचे घरगुती यंत्र तयार करून विज्ञान प्रदर्शनामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर केले. या साधनामुळे घरातील धान्याची स्वच्छता करणे, धान्यातील बारीक खडे वेगळे करणे, धान्यातील धूळ बाजूला करण्याचे काम सहज आणि सोप्या रीतीने करता येते, असे प्रयोगांमधून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रयोगाची तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. पारितोषिक वितरण कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, अमोल पाटोदेकर, आंबेवाडीकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी नगदे यास मार्गदर्शन केले.