धाराशिव (प्रतिनिधी)- बंजारा समाजाच्या तरुणाने एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे. यासाठी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे. पवन गोपीचंद चव्हाण या 32 वर्षाच्या तरुणाने मुख्यमंत्री यांच्या नावाने चिट्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. हैद्राबाद गॅझेट प्रमाणे मराठा समाजासोबतच बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण द्यावे असा उल्लेख केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील नाईकनगर तांडा येथील ही घटना आहे. 

शनिवार दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पवनने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पवनच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली. त्यामध्ये “हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे” अशी स्पष्ट मागणी करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पवन चव्हाण हा काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आरक्षण आंदोलनात सहभागी झाला होता. कालच तो गावाकडे परतला होता. आपल्या मित्रपरिवारात तो सतत आरक्षणाविषयी जनजागृती करत होता. मात्र आज सकाळी पुन्हा जिंतूरला जाण्याची तयारी करत असतानाच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

पवन चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नाईकनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुसाईड नोटच्या आधारे अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 
Top