धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, कळंब, वाशी, परंडा या तालुक्यातील बहुतांशी सर्कलमध्ये गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतशिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे. हातातोंडाशी आलेला पिकांचा घास पाण्यात बुडल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू झाला असून, पिके गेली, आता जगायचं कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

जिल्ह्याची पावसाची सरासरी 770 मिमी असून, आतापर्यंत 909.73 मिमी पाऊस सरासरी झाला आहे. 118.04 टक्के पाऊस झाल्यामुळे उडीद, मुग, मका, सोयाबीन, फळांची बाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 18 सप्टेंबर 2025 पर्यंत जिल्ह्यातील तालुक्यात याप्रमाणे पाऊस झाला आहे. धाराशिव तालुक्यात 881.60 मिमी पाऊस, तुळजापूर 1029.10 मिमी पाऊस, उमरगा 915.90 मिमी पाऊस, लोहारा 875 मिमी पाऊस, कळंब 926.20 मिमी पाऊस, भूम 919.40 मिमी पाऊस, वाशी 952.40 मिमी पाऊस, परंडा 778.20 मिमी पाऊस या प्रमाणे पाऊस झाला आहे. या पावसामुळे लाखो रूपयांच्या पिकासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. 


जलसाठ्यात वाढ 

जिल्ह्यातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण 226 सिंचन प्रकल्पांची संख्या असून, 1 मोठा सिनाकोळेगाव हा सिंचन प्रकल्प आहे. तर 17 मध्यम व 208 लघू सिंचन प्रकल्पाची संख्या आहे. जिल्ह्यात एकूण 1 मोठ्या प्रकल्पासह 142 सिंचन प्रकल्पात 100 टक्के जलसाठा झाला आहे. तर 18 सिंचन प्रकल्पात 75 टक्क्याच्यावर जलसाठा आहे. तर 24 सिंचन प्रकल्पात 51 ते 75 टक्के पेक्षा कमी जलसाठा आहे. 26 ते 50 टक्के जलसाठा 19 सिंचन प्रकल्पात आहेत. जिल्ह्यात वाढलेल्या जलसाठ्यामुळे रब्बी पिकाला फायदा होणार असून, पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. 

 
Top