कळंब (प्रतिनिधी)- धार्मिक व आध्यात्मिक परंपरा जोपासणाऱ्या जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मार्गदर्शनाखाली देवधानोरा आरती केंद्रामार्फत एक अत्यंत मंगलमय व भक्तिमय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दहा साधकांची ऑनलाइन साधक दिक्षा घेण्यात आली. या प्रसंगी संपूर्ण वातावरणात अध्यात्माची गोडी, भक्तिभाव व साधनेची प्रेरणा अनुभवायला मिळाली.

आरती केंद्र प्रमुख लक्ष्मण गायकवाड व संगीता गायकवाड यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. दीर्घकाळापासून भक्तांच्या मनात निर्माण झालेला उत्साह या सोहळ्यात ओसंडून वाहताना दिसला. साधकांनी आपल्या जीवनात धर्म, अध्यात्म व साधनेचा स्वीकार करून एक नवा संकल्प घेतला.

या सोहळ्यात साधकांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. “दिक्षेमुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जगतगुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या शिकवणीमुळे आमचे जीवन अधिक अर्थपूर्ण होत आहे,” अशी प्रतिक्रिया एका साधकाने दिली.

तर साधक वर्षा सावंत म्हणाल्या,  “आज मला साधक दिक्षा मिळाल्यामुळे माझं आयुष्य जणू नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतचं आयुष्य संसारात गेलं, पण आता साधनेच्या मार्गाने चालतांना खऱ्या समाधानाचा अनुभव मिळेल, याची खात्री वाटते. जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या कृपेने हे शक्य झालं. आरती केंद्र प्रमुखांनी दिलेलं मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळेच आज हा सोहळा माझ्या जीवनात अविस्मरणीय ठरला आहे.”

संपूर्ण सोहळ्यात गावकऱ्यांचा मोठा सहभाग होता. सर्वत्र मंगलध्वनी, आरत्या, भजनी मंडळांचे सूर आणि साधकांच्या डोळ्यांतून चमकणारा भक्तिभाव या सर्वामुळे देवधानोरा परिसरात अध्यात्मिक उर्जा निर्माण झाली. या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक चैतन्याची नवी जागृती झाली असून, “साधना हीच खरी संपत्ती” हा संदेश अधिक प्रभावीपणे जनमानसात पोहोचला आहे.


 
Top