तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष व इच्छुक उमेदवारांनी महिला मतदारांना आपल्याकडे वळवविण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात देखील काही पक्षाचे इच्छुक उमेदवार महिला मतदारांना तिर्थक्षेत्रांवर घेऊन जाऊन देवधर्म घडवून आपला मतदार निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तुळजापूर नगरपरिषदेला शासनाकडून दरवर्षी शेकडो कोटींचा निधी मिळतो. हा निधी आपल्या ताब्यात राहावा. यासाठी इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. श्रीगणेशोत्सवाचे स्पॉन्सरशिप, विविध कार्यक्रमांना मदत तसेच महिला मतदारांसाठी तिर्थयात्रांचे आयोजन अशा माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हिंदू धर्मात पितृपक्ष पंधरवड्यात देवधर्म करणे अशुभ मानले जात असले तरी कालावधी कमी असल्याने उमेदवारांनी हा काळही सोडलेला नाही. महाराष्ट्रासह परराज्यातील प्रमुख देवदेवतांच्या दर्शनासाठी तिर्थयात्रांचे आयोजन केले जात असून यावर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. तुळजापूर शहरातील प्रत्येक वार्ड/प्रभागातून चार ते पाच लक्झरी बसेस सोडल्या जात आहेत. प्रत्येकी तीन ते चार दिवसांच्या या तिर्थयात्रांमध्ये गरीब, श्रीमंत व उच्चशिक्षित महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. प्रथमच तुळजापूरातील मतदारांना ‘अच्छे दिन' आल्याचा अनुभव मिळत असून उमेदवारांचे खिसे मात्र रिकामे होत आहेत. अनेक वर्षांनी मतदार राजा झाल्याचा आनंद मतदार मनसोक्त लुटताना दिसत आहे.