तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे प्रथमच तालुकास्तरीय मॅट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल 60 हून अधिक शाळांमधून 148 मुलींनी आणि 175 मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या कुस्ती प्रकारात ग्रामीण भागातील मुलींचा इतका मोठा प्रतिसाद ही सामाजिक बदलाची सुखद चाहूल मानली जात आहे. पूर्वी देवी शाकंभरी नवरात्रोत्सवात घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसारखीच ओढ आता तालुकास्तरीय मुलींच्या कुस्तीबाबतही दिसत आहे. आरळी बुद्रुक येथे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल प्रमुखांनी स्वखर्चाने बांधलेले मॅट कुस्ती मैदान या यशामागे महत्त्वाचे ठरले. त्यामुळे मुलींचा कुस्तीप्रकारात वाढता सहभाग अधिक गतीमान झाल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी तालुका क्रीडा मार्गदर्शक इसाक पटेल, क्रीडा संयोजक राजेश बिलकुले, पंच बबलू धनके, सुंदर जवळगे, कपिल सोनटक्के, गजेंद्र जाधव, केंद्रप्रमुख अनंत हाके, गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष भास्कर पारवे, वस्ताद अजित भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
आरळी बुद्रुक ग्रामीण भागातील पहिली मॅट कुस्ती स्पर्धा
आरळी बुद्रुक येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील नव्याने उभारलेल्या अद्ययावत हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली. फौजदार संजय पारवे, आरळी बुद्रुक प्रशाला व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. ग्रामीण भागात क्रीडाप्रसारासाठी या स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरल्या.
गणेश पवार तालुका क्रीडा अधिकारी, तुळजापूर