धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत विविध आंदोलने लढलेले शेतकरी नेते जगदिश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात  बुधवार 17 सप्टेंबर रोजी प्रवेश घेतला. मुंबईत मातोश्री येथे शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेतले . यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात होत असलेल्या पक्षप्रवेशाने शिवसेनेचे पारडे जिल्ह्यात जड मानले जात आहे. त्यात सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील चर्चेतील नाव असलेले आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे जगदिश पाटील यांच्या प्रवेशाने सर्वत्र कौतुक होत आहे. करजखेडा ता. जि. धाराशिव येथील रहिवासी असलेले जगदिश पाटील शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनात आघाडीवर असतात.

या अगोदर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष होते. पक्षात फुट पडल्याने आणि एक गट भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याने त्यांनी एक वर्षापूर्वीच नाराज होऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पाटील यांनी विविध सामाजिक कार्यात सहभागी होऊन त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. यावेळी जगदीश पाटील यांच्यासोबत गोविंद गरड, विक्रम भोसले, बाळासाहेब पाटील, खंडू शिंदे, दत्ता चव्हाण - पाटील, नेताजी गायकवाड, अश्विन पाटील, सुभाष कळसुले, बालाजी सगट, मुकेश पाटील, महादेव ढोले, चंदू ताकमोगे, सुधीर गायकवाड, पल्लव पाटील, धनराज कुंभार, निखिल वाघमारे इत्यादी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top