धाराशिव  (प्रतिनिधी) - जिल्ह्यात वारंवार वेगवेगळी नैसर्गिक व कृत्रिम संकटे येत आहेत. यामध्ये नैसर्गिक क्रम व कृत्रिम संकटच जास्त ओढावलेली दिसत आहेत. कारण दोन वर्षापासून हा वाघ व बिबटे जिल्ह्यात वासरे, शेळ्या, गायी व म्हशी फाडीत आहेत. तर भूम तालुक्यातील एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. तर तुळजापूर तालुक्यातील सावरगाव काटी येथील दुसऱ्या शेतकऱ्यावर हल्ला केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये दोन्ही शेतकरी जखमी झालेले आहेत. जिल्ह्यात एक वाघ व २० पेक्षा जास्त बिबटे  धुमाकूळ घालीत आहेत. १९७१ नंतर प्रथमच अशा वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या वाघाचा आणि बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार सामाजिक वनीकरण, वन विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे करीत आहेत. 

धाराशिव जिल्हा हा आवर्षण ग्रस्त म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याचे पर्जन्यमान दरवर्षी कमी जास्त होत असल्यामुळे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशी स्थिती देखील निर्माण होते. मात्र या जिल्ह्यात बालाघाट डोंगर विस्तीर्ण पसरला असून या परिसरात वृक्ष लागवड देखील चांगल्यापैकी झालेली आहे. मोठे वनक्षेत्र, डोंगर दरी, डोंगर खपारी, पाण्याने भरलेले तलाव व मोठमोठे वृक्ष आदी नैसर्गिक देणगी लाभलेली आहे. त्यामुळे या भागात हरीण, काळवीट ससा, लांडगा, कोल्हा आदी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी दिसून येते. त्यातच शिवार मोठा आणि विरळ मानवी वस्ती यामुळे या पशुंना पोषक वातावरण आहे. दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातून वाघाने धाराशिव जिल्ह्यात पाऊल ठेवले. तेव्हापासून तो आजतागायत धाराशिव व लगत असलेल्या सोलापूर या दोन जिल्ह्यात त्याने आपला अधिवास कायम केला आहे. त्यांच्या जोडीला २० पेक्षा जास्त बिबटे अधिवास करून राहिलेले आहेत. या वाघामुळे गायी, म्हैस, बकरी, शेळी, वासरे व रेडकू आदींचा फस्त करुन फडशा पाडलेला आहे. तर दोन शेतकऱ्यावर हल्ला देखील केलेला आहे. 


टिपेश्वर ते येडशी अभयारण्य प्रवास 

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून वाघाने पलायन करीत धाराशिव तालुक्यातील येडशी येथील अभयारण्यात आगमन केले. त्यामुळे त्याचे नाव टिपेश्वर ठेवले असून तो येडशी अभयारण्य सर्वात सुरक्षित व नैसर्गिकदृष्ट्या उपयुक्त वातावरण असल्यामुळे त्याने या ठिकाणी अधिवास कायम केला आहे. या वाघाला पकडण्यासाठी चंद्रपूर व पुणे येथील दोन वेगवेगळ्या रेस्क्यू टींम्सना पाचारण करण्यात आले होते. त्या टीमने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपला सापळा रचला. मात्र त्यांना पकडण्यात यश आले नाही. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च देखील त्या टीमवर करण्यात आला. मात्र, त्या आलेल्या टीम आल्या हातांनी रिकाम्या परत गेल्या. त्यामुळे त्या खरोखरच वाघाचा बंदोबस्त करतात का ? केवळ देखाव्याचे काम करतात ? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. 


वरवंटी शिवारात पुन्हा दहशत !

या टिपेश्वर वाघाने गेल्या वर्षी धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवारातील घनदाट वनामध्ये अधिवास केला होता. त्याने वासरू व एका बैलाची शिकार केली होती. तर त्याच परिसरात शेळी व गायीला देखील फाडले होते. त्यानंतर त्याने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका व इतर ठिकाणी जाऊन धुमाकूळ घातला होता. मात्र, आज पुन्हा वरवंटी शिवारात त्याने दर्शन दिले आहे. या परिसरात डोंगर, डोंगर खपारी, पाण्याने भरलेले तलाव, छायांकित वन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचा अधिवास सुरक्षितपणे होत आहे. डोंगराला लागूनच गाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाहताच त्याचा पाठलाग करीत त्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. त्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाची टीम त्या भागात दाखल झाली. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्या उपाय योजना करण्यात येणार आहेत की नाहीत ? असा प्रश्न भयभीत झालेले नागरिक विचारु लागले आहेत.


 
Top