तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे शारदीय नवरात्र उत्सवात यंदा “नऊ दिवस नऊ सन्मान” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा दररोज एक याप्रमाणे सन्मान करून गौरव केला जाणार आहे. जिल्ह्यातील नऊ महिलांची निवड करण्यात आली आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने या महिलांची निवड केली आहे. यात शेवया उत्पादन, बालविवाह प्रतिबंध, आवळा उत्पादने, शेळीपालन, शासकीय योजना प्रचार, पोषण परसबाग, महिला सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. याशिवाय, पारंपरिक बियाण्यांचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा विशेष सन्मान होणार आहे. या उपक्रमामुळे समाजातील महिलांच्या कार्याचा गौरव होऊन महिला सक्षमीकरणाला नवा आयाम मिळणार आहे.
यामध्ये अस्मिता अविनाश सुर्यवंशी रा. गुंजोटी ता.उमरगा, बाबई उर्फ सुजाता लक्ष्मण चव्हाण अणदूर ता. तुळजापूर, अनिता नामदेव देवकते, रा. सौदणा, ता. कळंब, प्रियंका रघुवीर पासले, रा. तीर्थ ता. तुळजापू, सारिका रामेश्वर येळेकर, रा. बेंबळी ता. धाराशिव, रोहिणी धीरज सुरवसे, रा. वाखरवाडी ता. धाराशिव, नंदा राजेश जगताप, रा. वाघेगव्हाण ता. परांडा, वैशाली जाधव, रा. गनेगाव भूम, लक्ष्मी कल्याण मोरे, रा. बेंडकाळ ता. लोहारा यांचा सन्मान होणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या या सन्मानामुळे समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना प्रेरणा मिळणार आहे.