धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यासह परिसरातील गावांना शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे पिकांचे, अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले. काही गावांचा संपर्क तुटला. घरांत पाणी शिरल्यामुळे अनेक गावांत नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. नागरिक, शेतकरी हवालदिल झाले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गावोगावी जाऊन नागरिक, शेतकऱ्यांना दिलासा दिला. अधिकाऱ्यांना घटनास्थलावर बोलावून घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रविवारी सकाळीच आमदार पाटील यांनी धाराशिव सोडले. जवळे (दु.), दुधगाव, ढोकी, तेर, पानवाडी, रामवाडी, भंडारवाडी, पाडोळी (आ.) आदी गावांना भेट दे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या पाहणीवेळी धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव याही उपस्थित राहिल्या. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आमदार पाटील यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळावर बोलावून घेतले.
आमदार पाटील यांनी चिखल तुडवत नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अनेकांच्या शेतातील बांध फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली आहे. तेरणा धरण भरल्यामुळे दरवाजे उघडण्यात आले आणि ते पाणी शेतांमध्ये शिरले. दुधगाव- खामगाव रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांसह तरुण, मुलांशीही संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. रविवारी सकाळी सुरू झालेला आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांचा पाहणी दौरा सायंकाळी सहाच्या सुमारास संपला. पंचनामे करण्याचे, यातून कोणालाही न वगळण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.