धाराशिव (प्रतिनिधी)- पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपी करीत भूम व वाशी तालुक्यातील 13 शेतकऱ्यांनी 28 जुलैपासून धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यापैकी तिघांची प्रकृती बिघडल्यामुळे आंदोलनकर्त्यांचा उद्रेक झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करत काही आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या नियोजन भवनच्या इमारतीवर चढले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, पोलिस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत अखेर चर्चा केली.
पवनचक्की उभारणाऱ्या कंपन्यांचे शेतकऱ्यांसोबत अनेक ठिकाणी वाद झाले आहेत. पवनचक्की कंपनीकडून फसवणूक झाल्याचा आरोपी करीत वाशी व भूम तालुक्यातील 13 शेतकरी दि. 28 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. पाच दिवसात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देवून पाठिंबा दर्शवला आहे. विविध पक्ष संघटनांकडून पाठिंबा मिळत असला तरी प्रशासनाचे अधिकारी मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपी उपोषणकर्त्यांनी केला. जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
अखेर उद्रेक
शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यापैकी काशीनाथ भोसले, नवनाथ चौधरी आणि सुजित मोरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे आंदोलनकर्त्यांचा उद्रेक झाला. दोन तास यांनी रास्ता रोको केला. तर काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या नियोजन भवनाच्या इमारतीवर चढल्या. त्यांनी तेथून उडी मारण्याची धमकी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनकर्ते आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे गेट सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद होते. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, पोलिस अधिक्षक शफकत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी चर्चेत आंदोलनकर्त्यांनी रिन्यु वींड पावर व सेरिंटिका सह अन्य पवन उर्जा कंपन्यांचे कामे त्वरीत थांबवावीत व आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतरच काम चालू करावे. अशा प्रमुख दोन मागण्या मांडल्या. यावेळी जिल्हा प्रशासनाने सहमती दर्शविल्यानंतर आंदोलनकर्ते थोडे शांत झाले. आंदोलनाचा आज पाच दिवस असून, कंपन्यांचे अधिकृत आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे सांगण्यात आले.