धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात 100 पेक्षा अधिक गणेश मंडळांकडून श्री गणरायाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. देखावे ही पहिल्या दिवसापासूनच तयार करण्यात आले आहेत. दरम्यान शहरात विविध ठिकाणी श्री गणेशाच्या मुर्ती विक्रीचे 50 स्टॉल उघडण्यात आले होते. बुधवारी सुमारे 10 हजार लहान मोठ्या घरगुती मुर्तीची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावर्षी गणेश मुर्तीचे दर 40 टक्के वाढले आहेत. धाराशिव शहरासह जिल्ह्यात दीड हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वत्र सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने मंडप उभा करणे, देखावे तयार करणे, भव्य-दिव्य प्रवेशद्वार तयार करणे आदी कामे मंगळवारी करण्यात आली होती. श्री गणेशाची प्रतिष्ठापना ज्या ठिकाणी बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी करण्यात आली. यावेळी ढोल, ताशे, बॅडपथक आदीसह मिरवणुकाही काढण्यात आल्या. परिसरात भगवे ध्वज लावून सजावट करण्यात आली. शहरातील आनंदनगर पोलिस ठाणे व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 100 पेक्षा अधिक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यापैकी काही गणेश मंडळांनी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.
घराघरात सुध्दा श्री गणरायाचे आगमन झाले आहे. या दृष्टीने सर्वत्र शहरात श्री गणेशाच्या सहा इंचापासून ते तीन फुट उंचीपर्यंतच्या मुर्ती खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, राष्ट्रमाता जिजाऊ चौक, नेहरू चौक, सांजा चौक, जिल्हा न्यायालय परिसर अशा अनेक ठिकाणी श्री गणेश मुर्ती विक्रीची 50 दुकाने थाटण्यात आली होती. येथील विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार 10 हजार पेक्षा अधिक मुर्तीची विक्री झाली आहे. यावर्षी 40 टक्के गणेश मुर्तीचे दर वाढले आहेत. या संदर्भात मुर्तीकार बालाजी डोंगे यांनी गणेश मुर्ती तयार करण्याच्या सर्व साहित्याचे दर वाढल्यामुळे मुर्तीचे दर 40 टक्के वाढले असल्याचे सांगितले.