कळंब (प्रतिनिधी)- शहरातील जनजागृती प्राथमिक विद्यालयात शनिवारी सकाळी पुणे येथील सह्याद्री इंटेरियरचे उद्योजक रमेश शिंदे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्वतः उद्योजक रमेश शिंदे उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पांडुरंग कुंभार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, अमिशा शिंदे, संतोष शिंदे, मुख्याध्यापक अश्रुबा माने, संगीता डोके, दीपा सिरसाट, विकास मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रमेश शिंदे म्हणाले, “माझे कार्यक्षेत्र राज्यभर असले तरी गावाची ओढ कायम आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यामुळे येथे असलेल्या अडचणी मला ठाऊक आहेत. माझ्या भागातील विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेऊन उद्योग क्षेत्राकडे वळावे व आपली आर्थिक प्रगती साधावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रदेश सरचिटणीस पांडुरंग कुंभार यांनी गौरवोद्गार काढताना म्हटले की, “खेड्यातून शिक्षण घेऊन शहरात स्थिरावले तरी गावाशी नाळ तोडणारे अनेक आहेत. मात्र रमेश शिंदे यांनी गावाबद्दलची ओढ कायम ठेवून सामाजिक कार्याला चालना दिली आहे. हे कार्य वाखाणण्याजोगे असून इतर भूमिपुत्रांसाठी प्रेरणादायी आहे.”परमेश्वर पालकर यांनीही शिंदे कुटुंबियांचे कौतुक करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मिळताच आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अश्रुबा माने यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र चंदनशिवे यांनी केले.