भूम (प्रतिनिधी)- लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त भूम शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे यंदा जयंती उत्सवात समाजातील तळागाळातून आलेले, झाडू विकून आपला उदरनिर्वाह करणारे 75 वर्षीय भगवान रिटे यांना ध्वजारोहणाचा मान देऊन समाजाच्या कृतज्ञतेचा सुंदर संदेश देण्यात आला.
भगवान रिटे यांनी आयुष्यभर कष्ट करून, झाडू विकण्याचे साधे पण प्रामाणिक काम करत आपले जीवन जगले आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची, त्यांच्या समाजाभिमुखतेची जिवंत प्रतिमा आहे. ध्वजारोहणानंतर रिटे यांचा पुष्पहार, देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कष्टमय जीवनप्रवासाला सलाम केला.
मातंग समाजाच्यावतीने साठे चौक येथील समाज मंदिरात यूवक नेते जयंती समिती अध्यक्ष प्रदीप साठे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या समवेत नितीन साठे, सचिन साठे, आकाश साठे, महादेव साठे आणि सौ. अश्विनी साठे यांनी कार्यक्रमाचे संयोजन सांभाळले.
कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, सरचिटणीस आबासाहेब मस्कर, माजी सैनिक संघटना अध्यक्ष हेमंत देशमुख, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष बापू बगाडे, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, शिवसेना ज्येष्ठ नेते दिलीप शाळू महाराज, तालुका प्रमुख अनिल शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, अख्तर जमादार, अमोल सूरवसे, पत्रकार चंद्रमणी गायकवाड, दीपक पवार, निलेश शेळके, पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे, उपनिरीक्षक सरोदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. संयोजकांनी सांगितले की, “डॉ. साठे यांनी आपल्या साहित्य व कार्यातून वंचित आणि शोषितांसाठी आवाज उठवला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भगवान रिटे यांच्यासारख्या साध्या पण कष्टकरी व्यक्तीला सन्मान देणे हीच खरी आदरांजली आहे.” यावेळी मोठया संख्येने समाज बांधव व नागरिक उपस्थित होते.