धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये स्थायी आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी पुढील चार महिन्यात 350 आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक गरजांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आरोग्य यंत्रणेला तसे निर्देश दिले आहेत. आरोग्य शिबिरांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
स्थायी आरोग्य सेवा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिन्यातून किमान एक तरी आरोग्य शिबीर आयोजित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम आमदार पाटील यांनी हाती घेतला आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 350 शिबीरांमध्ये गंभीर आजार आढळलेल्या रुग्णांवर पुढील उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया होईपर्यंत त्याचा उपलब्ध तंत्रज्ञ वापरून पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले होते.
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयामार्फत राबविण्यात येत असलेली ‘फिरता दवाखाना' ही संकल्पना ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र नसलेल्या प्रत्येक गावात आता अंमलात आणली जाणार आहे. यासाठी किमान 20 मोबाईल दवाखाना एम्बुलेंस आवश्यक असून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची चर्चाही यावेळी करण्यात आली. सध्या जिल्ह्यात या प्रकारच्या तीन मोबाईल व्हॅन उपलब्ध आहेत.बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चौहान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस. एल. हरिदास यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.