लोहारा (प्रतिनिधी)- कौटुंबिक वादाच्या कारणावरून मुलाने व सुनेने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना लोहारा शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलगा व सुनेविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात मंगळवारी दि. 26 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीने संशय येऊ नये म्हणून केलेला बनाव उघड झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर येथील सौदागर सुरेश रणशूर (वय 34) हा आपल्या पत्नीसह आई-वडिलांसोबत राहतो. त्याचे दोन भाऊ कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मागील काही महिन्यांपासून सौदगार व आईचे कौटुंबिक कारणावरून सतत वाद होत होता. सोमवारी दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच घरात जोरदार वाद सुरू झाला होता. दुपारी बाराच्या सुमारास या वादाचे रुपांतर मारहाणीमध्ये झाले. मुलगा सौदागर व सून पूजा रणशूर (वय 29) यांनी लाथाबक्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत आई उमाबाई रणशूर (वय 55) यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मंगळवारी दि. 26 ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आरोपीचा भाऊ महेश सुरेश रणशूर (वय 35, रा. लोहारा, ह.मु. शिवहरी ग्रीन सिटी, वापी, जि. वलसाड, गुजरात) यांनी लोहारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून सौदागर, पूजा या पती-पत्नीविरूध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महतेचा बनाव फसला
आईच्या खुनानंतर स्वतःवरच संशय येऊ नये म्हणून, आरोपी सौदागर आणि त्याची पत्नी पूजा यांनी आखलेला बनाव शेवटी फसला. आई उमाबाई यांचा मृत्यू स्वतःच्या मारहाणीने झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिस व लोकांची दिशाभूल करण्यासाठी आत्महत्येचा ड्रामा रचला. आरोपींनी उमाबाई यांनी फॅनला गळफास घेतल्याचे भासवण्यासाठी फॅनचे पातेच वाकडे केले. विशेष म्हणजे आरोपी सौदागर आणि पत्नी पूजा यांनी उमाबाई यांना शिवीगाळ व बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ त्याच दिवशी फिर्यादी महेश यांच्या हातात आला. या पुराव्यामुळे आत्महत्येचा बनाव क्षणात खोटा ठरला आणि आईच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींची गुन्हा उघड झाला.