कळंब- कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा.यांत्रिकीकरणाच्या आजच्या युगात बैलांची संख्या खूपच कमी झाली आहे भविष्यात बैलपोळा साजरा होणे बंद होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे आमच्या लहानपणी पोळा सण प्रचंड उत्साहात साजरा केला जायचा अगदी नागपंचमी सणापासून आम्ही पोळा सणाची वाट पाहत असो तालुक्याच्या ठिकाणी शाळेत असूनही आई-वडील शेती करत असल्याने पोळ्या विषयी मनात एक वेगळीच ओढ असायची आठ ते दहा दिवस अगोदरच शहरातील बाजारपेठ बैलपोळ्याच्या साहित्याने सजलेल्या असायच्या मग काही मग काय रस्त्याने जाता येता आपल्या बैलांसाठी काय काय घ्यायचे हे मनात ठरवलेले असायचे.
बैलपोळ्याच्या अगोदरच्या दिवशी गावाकडे जाण्याची परवानगी मिळाल्यावर चुलत भाऊ व माझ्याकडे कोणता बैल मी सजवणार ,हा बैल माझा तो बैल माझा यावरून शाब्दिक चकमक होऊन पुन्हा समझोत्याने बैलांची निवड व्हायची. आमच्याकडे चार बैल असायचे दुपारी गावाकडे पोहोचल्यावर बैल कोणत्या शेतात आहेत याचा अंदाज घेऊन त्या शेतात जायचो. शेत गावापासून दीड दोन किलोमीटर लांब असूनही प्रचंड उत्सुकतेमुळे आम्ही लगेच शेतात जायचो. शेतात गेल्यावर प्रवासातच निवड केलेल्या आपल्या बैलांचे कासरे हातात घेऊन मग आपला बेल कसा जास्त जगेल (जास्त चारा खाईल) याची काळजी घेतली जाई. शेतातून घरी येताना आपल्या बैलाचा कासरा आपल्याकडे असणे यात एक वेगळाच आनंद असायचा. संध्याकाळी पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी खांदे मळणी असते यामध्ये सर्व बैलांची पूजा केली जाते. खांद्याला पळसमूळाच्या साह्याने तूप हळद लावली जाते. पूजा केल्यानंतर बैलांना चपाती चारली जाते. प्रतिनिधिक स्वरूपात एका बैलाला गोंडा बांधला जातो. दरवर्षीच्या निरीक्षणातून असे लक्षात आले की चार बैलापैकी कोणता तरी एक बैल चपाती खायचा नाही मग याचे कारण विचारल्यानंतर आजोबा सांगायचे की तो बैल रुसला असेल त्याच्या रुसण्याचे कारण काय असेल हे मात्र त्यावेळेस लक्षात यायचेच नाही पण आता वाटते कदाचित प्रातिनिधिक स्वरूपातला आपला मान आपल्याला मिळाला नाही असे तर त्याला सांगायचे नसेल.
रात्री खांदेमळणी झाल्यावर उद्याच्या पोळ्या विषयीची उत्सुकता असायची त्यामुळे लवकरच झोपायचो. म्हणजे सकाळी लवकर उठता येईल सकाळी लवकर उठून सर्वांसोबत बैल धुण्यासाठी नदीवर जायचो. आमचे खोंदला गाव मांजरा नदी काठावर असल्याने सर्व गावातील बैलांची नदीवर गर्दी असायची जिकडे नजर जाईल तिकडे बैलच दिसायचे. एखादा बैल पाण्यात जाण्यासाठी तयार नसायचा त्याला पाण्यात नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागायची. सर्वजण अगदी आपले बैल स्वच्छ दिसावेत यासाठी साबण,निरमा इत्यादीचा वापर करून बैल चांगले धुवायचे. पांढरे बैल स्वच्छ धुणे हे एक दिव्यच असायचे. कधी कधी बैल धुवून पाण्याच्या बाहेर काढले की पुन्हा शेणाने भरला की परत धुणे आलेच. बैल धुवून घरी आणल्यानंतर त्यांना कन्या (गहू भरडून शिजवलेल्या व त्यामध्ये गूळ घातलेला) चारल्या जायच्या. हे सर्व झाल्यावर मग बैलांना चारण्यासाठी शेतात नेले जायचे.
इकडे शेतात गोंडे बांधण्यासाठी बैलांच्या सजावटीचे साहित्य बनवण्याची लगबग सकाळपासूनच सुरू व्हायची. आजोबा, चुलते, वडील हे एका रूममध्ये सर्व बनवत असत. तोपर्यंत सर्व देवांसाठी नैवेद्य बनवण्याचे काम आजी व आई यांचे सुरू असायचे. मग काय सकाळी गावातील सर्व देवांना तेल घालणे, गोंडा बांधणे, नैवेद्य दाखविणे हे काम बच्चे कंपनीकडे असायचे. ते आनंदाने केले जायचे. पोळ्याला आमच्याकडे चाबूक बनवायची व वाजवण्याची प्रथा असायची. आंबाडीच्या वाकापासून ते बनवलेले असायचे. ते वाजविण्याचे कौशल्य ज्याच्याकडे आहे त्याच्या चाबकाचा मोठा आवाज यायचा. मला तो चाबूक वाजवताना एका पोळ्याला डोळ्यावर लागला होता दिवसभर डोळा उघडता येत नव्हता.
पोळ्याच्या दिवशी प्रत्येक शेतात शेतातील अवजारांना गोंडा बांधावा लागतो व शेतातील देवांना नारळ फोडावे लागतात. वर्षभरात सर्वात जास्त नारळ पोळ्याच्या दिवशी फोडले जातात. आमचे शेत वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे जवळपास हे सगळे करण्यासाठी दहा ते बारा किलोमीटर जावे लागायचे. मी माझ्या चुलत्यांसोबत दरवर्षी पोळ्याला गोंडे बांधण्यासाठी जायचो. प्रचंड पाय दुखायचे परंतु त्या मागील आनंदामुळे त्याचा त्रास वाटायचा नाही. बारा एक वाजेपर्यंत हे आटपायचे.
त्यानंतर बैलांची शिंगे रंगवणे ,बैलांच्या पाठीवर रंगविणे, बैलांची ढाल सजविणे यामध्ये दोन तीन तासाचा वेळ जायचा. बैल चांगले सजविणे यामध्ये स्पर्धा असायची. सर्वजण बैल सजविण्यासाठी कौशल्य पणाला लावायचे. ढालीला फुगे लावणे चमकी, बेगड चिटकविणे इत्यादी कामे केली जायची. आमच्याकडे चार बैल असायचे परंतु ढाल दोनच मग काय आपल्या दोन पैकी एकाला तरी ढाल लावायला भेटावे यासाठी घरच्यांकडे हट्ट केला जायचा. बैलांच्या गोठ्यात चुना व काऊच्या साह्याने रंगकाम म्हणजेच ठसे मारले जायचे. एका डालग्यात शेतीचे चाडेनळे, गाडगे, जु इत्यादींना रंगवले जायचे.
गावामध्ये सर्वप्रथम बैलांच्या पूजनाचा मान पाटलांकडे असायचा. पाटलांच्या बैल पूजेनंतर मग गावातील इतरांच्या बैलांचे पूजन केले जायचे. आमच्या वाड्यात आठ- नऊ बैल जोड्या असायच्या. गावातील सर्वांच्या बैलपुजनाचे ठिकाण ठरलेले असायचे. बैल पूजेसाठी म्हणजेच बैलाचे लग्न लावण्यासाठी ब्राह्मण (देवबप्पा बोलावले जायचे आमच्या गावासाठी एकच ब्राह्मण (देवबाप्पा) होते. मग काय ते त्या दिवशी व्हीआयपीच असायचे त्यांना प्रत्येक ठिकाणी बोलवायचे. बैलाचे लग्न मंगलाष्टक म्हणून लावले जायचे. त्यासाठी चाउर चाउर चांगभलं पाऊस आला चांगभलं म्हणत बैलांना प्रदक्षिणा घातली जायची. तो म्हणण्याचा मान आमच्या घरात होता. माझे चुलते ते म्हणायचे आम्ही त्यांच्या मागे पराती वाजवत म्हणायचो. खूप मजा यायची अगदी परातीला खोलगे पडेपर्यंत आम्ही वाजवायचो.
बैल पूजा झाल्यानंतर बैलांची गावातून मिरवणूक काढली जायची. म्हसोबा - मारुतीच्या मंदिराला प्रदर्शना घालावी लागे. पूर्ण रस्त्याने बैलांची सजावट पाहण्यासाठी तोबा गर्दी असायची. लहानपणी आम्ही मिरवणुकीत बैलावर देखील बसायचो. बैलावर बसल्यावरचे फिलिंग शब्दात व्यक्त करणे अश्यकच.मिरवणुकीनंतर आमच्या वाड्यात प्रत्येकाच्या घरासमोर बैलांना ओवाळले जायचे व त्यांना पोळी चारली जायची. एक एका बैलाच्या वाट्याला आठ ते दहा पोळ्या यायच्या. मग काय बैलाची मजाच असायची. बैल पूजेनंतर गावातील म्हसोबा, मारुतींना नारळ फोडले जायचे व ते सर्वांना वाटले जायचे. लहान मुले अगदी नारळाची करवंटी घेऊन त्यामध्ये नारळ गोळा करायचे. गावातील प्रत्येक माणूस कदाचित पूर्ण वर्षभर खात नसेल एवढे नारळ पोळ्याच्या दिवशी खायचा. नारळ वाटून झाल्यानंतर पोळ्याचा उपवास सोडला जाई. तो सोडल्यानंतर पोळ्याची सांगता होत असे. व यानंतर आम्हाला पुन्हा पुढच्या वर्षीच्या पोळ्याचे वेध लागायचे. या वर्षी राहून गेलेल्या गोष्टी पुढच्या वर्षी नक्की करूयात या आशावादास पुढच्या पोळ्याची उत्सुकता असायची.
शब्दांकन: श्री. सचिन नानासाहेब लांडगे
(खोंदला ता.कळंब जि.धाराशिव)
संकलन - विलास मुळीक