धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात ‘अंगदानजीवन संजीवनी अभियान' अंतर्गत 3 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान ‘अवयवदान जनजागृती पंधरवडा' उत्साहात राबविला जात आहे.3 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आरोग्य व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात 3241 ऑनलाईन अवयवदान शपथ नोंदणी झाली असून,धाराशिव जिल्हा राज्यात 7 व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
अभियानाचा एक भाग म्हणून 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेत 1339 आशा स्वयंसेविकांसाठी यूट्यूब लाईव्हद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.राज्य आशा कक्ष व राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या प्रशिक्षणात अवयवदानाचे सामाजिक,वैद्यकीय व नैतिक महत्त्व,आवश्यक माहिती तसेच संवाद कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
प्रशिक्षणासाठी नोंदणी <https://tinyurl.com/RegisterASHA> या लिंकवर तर थेट सहभागासाठी <https://tinyurl.com/ODAwarenessBatch2> या लिंकवर जावे. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती होऊन अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व आहे.
अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, मेंदूमृत व्यक्तीचे अवयव अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. मात्र यासाठी समाजात विश्वास निर्माण करणे,गैरसमज दूर करणे व अंधश्रद्धा मोडणे आवश्यक आहे.आशा स्वयंसेविकांच्या प्रयत्नांतून धाराशिव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर येईल,असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी व्यक्त केला.