मुरूम (प्रतिनिधी)- दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी ठीक सायंकाळी सहा वाजता रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय केंद्र मुरूम येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय केंद्र लोहारा येथील सरिता बहनजी होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी आणि सचिव कल्लप्पा पाटील हे होते.
ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचे मुख्य केंद्र राजस्थान मधील माउंट आबू येथे असून त्यांच्या अनेक शाखा जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून अध्यात्मिक शांतता आणि ध्यानधारणा हे मानव कल्याणासाठी किती महत्त्वाचे आहे याचा प्रसार आणि प्रचार करणारी एक आध्यात्मिक विश्वविद्यालय आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले.
ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय केंद्र मुरूम येथील सर्व बहनजी यांनी रोटरी क्लब मुरूमच्या सर्व सदस्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरा केला. अध्यक्षीय समारोपात सरिता बहनजी म्हणाल्या रक्षाबंधन हे एक बहीण भावाच्या नात्यातील दुरावा कमी करण्याचे काम करते आणि प्रेम वाढवण्याचे काम हे रक्षाबंधनाच्या माध्यमातून होतं. रक्षाबंधन हे बहिण भावाचे पवित्र नातं जपण्याचे काम या माध्यमातून होतं आणि हे कायमस्वरूपी टिकावं यासाठी आम्ही ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न करतो.
या कार्यक्रमात रक्षाबंधनाची भेट म्हणून रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने आणि रोटे शरणाप्पा धुम्मा यांच्या सौजन्याने ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय मुरूम केंद्राला फ्रिज भेट देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचे प्रमुख राजू भैय्या यांनी केले तर आभार रोटरी क्लब मुरूम सिटीचे सचिव कल्लप्पा पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी रोटे सुनील राठोड ,रोटे.डॉ.नितीन डागा, एडवोकेट उदय वैद्य, प्रा राजेंद्र वाकडे, रोटे प्रकाश रोडगे, रोटे विष्णुदास मुंदडा आणि ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय मुरूम केंद्राचे भक्तगण उपस्थित होते.