उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील भारत विद्यालय, मळगी येथील अरविंद व्यंकटराव यादव यांची नुकतीच मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली आहे.
या नियुक्तीमुळे संपूर्ण संस्थेच्या शिक्षकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानिमित्ताने यादव गुरूजींनी आज भारत विद्यालय, बेडगा येथे सदिच्छा भेट दिली.
या भेटीचा प्रसंग अतिशय आनंददायी आणि उत्साहवर्धक ठरला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय भानुदास शिवरामपंत माने (बापू) यांनी यादव गुरूजींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार केला. बापूंनी त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्यात संस्थेचा नेहमीच पाठिंबा राहील असे आश्वासन दिले. यादव गुरूजींनी बापूंचा आशीर्वाद घेत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी भारत विद्यालय, बेडगा येथील मुख्याध्यापक आर. एल. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना यादव सरांच्या कार्याचा गौरव केला. “संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीसाठी सक्षम, समर्पित आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक असते, आणि यादव गुरूजी हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत,“ असे मत त्यांनी व्यक्त केले.
सत्कार कार्यक्रमात शिक्षकवर्ग, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात यादव गुरूजींचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेबद्दल निष्ठा, कार्यात प्रामाणिकपणा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले असून, पुढील काळात संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक उज्ज्वल होईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.