वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील घोडकी आणि दसमेगाव शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या आणि रस्त्यांच्या नुकसानीची पाहणी केशव सावंत यांनी केली.
घोडकी येथील साठवण तलावाच्या सांडव्यातून वाहून गेलेल्या पाण्यामुळे घोडकी ते वाशी रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून, त्या ठिकाणी तात्पुरता रस्ता सुरू करण्याच्या सूचना सावंत यांनी दिल्या. तत्काळ रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यानंतर दोन्ही गावांच्या शिवारातील तसेच तालुक्यातील इतर भागांतील शेतपिकांचीही पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी वाशी तहसीलदारांना भेटून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत तसेच ज्या विहिरी पाण्यात बुडून गेल्या आहेत, अशांना तात्काळ मदत देण्याचे निर्देशही सावंत यांनी तहसील प्रशासनाला दिले.
या पाहणीनंतर तहसीलदारांनी उद्या स्वतः घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तालुक्यात मागील आठवड्याभरापासून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः 15 आणि 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तलाव भरून वाहू लागले असून त्यामुळे शेतीसह अंतर्गत रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पाहणी दौऱ्यात केशव सावंत यांच्यासोबत शिवसेनेचे तालुकास्तरीय पदाधिकारी तसेच गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.