धाराशिव (प्रतिनिधी)- येथील घरातून कोणासही काहीही न सांगता निघून गेलेल्या दोन बालकांना शोधून त्यांचे आई-वडिलांचे ताब्यात सुखरूप देऊन पोलीस हवालदार दिपक महादेव लाव्हरे पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच शहरातील शाळा,कॉलेज, क्लासेस व रहदारीच्या ठिकाणी छेडछाड करणारे,दादागिरी करणारे गुंडगिरी करणारे तसेच वाहनांना कर्णकर्कश हॉर्न बसवून शांतता भंग करणाऱ्या टवाळखोरावर योग्य ती कार्यवाही करून शहरात शांतता राखण्याचेही उत्कृष्ट कार्य केलेले आहे. 

तसेच त्यांनी शाळा कॉलेज व क्लासेस मधील विद्यार्थ्यांना कायदे विषयी, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, आर्मी भरती व खेळांबाबत योग्य मार्गदर्शन करून त्यांना वाईट गोष्टी पासून दूर राहण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. म्हणून पोलीस विभागाचे पोलीस हवालदार दिपक महादेव लाव्हरेपाटील नेमणूक भरोसा सेल महिला छेडछाड विरोधी पथक धाराशिव यांचा स्वातंत्र्य दिना दिवशी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांनीही त्यांना स्वातंत्र्य दिना दिवशी प्रशंसापत्र देऊन सत्कार केला. तसेच श्रीपतराव भोसले हायस्कूल यांच्यामार्फत त्यांना मानपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल विविध सामाजिक संस्थांनी व शैक्षणिक संस्थांनी सन्मानपत्र व मानपत्र देऊन त्यांचा गौरव देखील केलेला आहे. सध्या दिपक लाव्हरेपाटील यांच्या कामाचे कौतुक विद्यार्थी, पालक, शिक्षकासह वाहन चालक व शहरातील व्यापारी देखील करत आहेत. 


 
Top