धाराशिव (प्रतिनिधी)- पुढील महिन्यात 24 सप्टेंबर 2025 पासून धाराशिव जिल्ह्यात शासकीय रेखाकला परीक्षा सुरू होणार आहेत. परंतु कलाशिक्षक अभावी, कला शिक्षक भरती बंद असल्याने विद्यार्थ्यांचे कलाशिक्षण विषयाचे नुकसान होत आहे. धाराशिव जिल्ह्यात एकूण परीक्षा केंद्र 17 असून 16 कार्यरत आहेत. एकूण परीक्षा केंद्रापैकी 10 परीक्षा केंद्रावर कायम कलाशिक्षक हे पदच अस्तित्वात नाही. तर उर्वरित 07 केंद्रावर कायम कलाशिक्षक कार्यरत आहेत. म्हणजे परीक्षा चित्रकलेची आणि ती परीक्षा घेण्याकरिता चित्रकलेचे गुरुजीच नाहीत. याचा परिणाम असा की कला शिक्षक नसणाऱ्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षेस बसण्याचे प्रमाण कमी आहे. जि प मंगरूळ ता. तुळजापूर या परीक्षा केंद्रावर मागील दोन वर्षापासून विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट केलेले नाहीत. सदर केंद्रप्रमुख /मुख्याध्यापक यांना वरील काम कला शिक्षकांअभावी मोठे संकट वाटते.

लहान शाळांना विद्यार्थी संख्या आणि इमारत बांधकाम यामुळे नवीन परीक्षा केंद्र घेताना जाचक अटी असल्याकारणाने ते मिळत नाही, जिल्ह्यात प्रत्येक वर्षी या केंदावरून 15 ते 17 हजार विद्यार्थी वरील परीक्षा देत असतात. हे प्रमाण राज्यात सात ते आठ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात आहे.कला शिक्षकांची भरती  “हायस्कूल तेथे कलाशिक्षक “ झाल्यास कलाशिक्षणाची परवड थांबेल.

इलेमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आवडीच्या व आयुष्यभर स्मरणात राहतील इतक्या महत्वाच्या आहेत, या परीक्षा उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इ. 10 वी बोर्ड परीक्षेत ए, बी व सी हे ग्रेड असणाऱ्या  विद्यार्थांना अनुक्रमे 7, 5 व 3 गुणांची सवलत दिली जाते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये  कलाशिक्षण व कलाशिक्षकाला महत्त्व दिले गेले आहे.दहावी इयत्ते करीता '“कला '“ हा विषय अनिवार्य केलेला आहे,परंतु शासनाच्या धोरणामध्ये कला शिक्षक नेमणूक धोरण अवलंबल्यास विचाराला कृतीची जोड दिली गेल्याचे चित्र शिक्षण क्षेत्रात निर्माण होईल.

 
Top