तुळजापूर (प्रतिनिधी)- “निसर्गाची देणगी, आरोग्याची जाणीव” या संकल्पनेला उजाळा देत कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथे आज तालुका स्तरीय रानभाजी महोत्सवाचा रंगतदार सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन शास्त्रज्ञ वर्षा मरवाळीकर, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा वैभव लोंढे तसेच सर्व मंडळ कृषी अधिकारी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनावेळी आबासाहेब देशमुख यांनी रानभाज्यांच्या आयोजनाची पार्श्वभूमी उलगडली तर आहारतज्ञ वर्षा मरवाळीकर यांनी “रानभाज्या  आहारातील पौष्टिक साथी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

महोत्सवात महिला शेतकऱ्यांची सर्जनशीलता खुलून आली. नाईचा खार, लोणचे, शेवगा वडी, धपाटे, शेवग्याच्या पानाची चटणी, पुलाव अशा विविध रानभाज्यांवर आधारित पदार्थांच्या सुगंधाने संपूर्ण परिसर दरवळला. प्रदर्शन पाहणाऱ्यांनीही भरभरून कौतुक केले. तालुक्यातील 100 हून अधिक शेतकरी या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी उपस्थित राहून, ग्रामीण परंपरा आणि आरोग्यवर्धक आहार यांचा संगम अनुभवला.

 
Top