वाशी (प्रतिनिधी)- वाशी शहर व तालुक्यात गुरुवारी दि.14 ऑगस्ट सायंकाळी पासून शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात सरासरी 86.7 मिमी पावसाची नोंद झाली.या पावसाची अतिवृष्टी अशी नोंद झाली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
रात्रभर झालेल्या पावसामध्ये शेती,दुकाने,रस्ते व रस्त्यावर असलेल्या पुलाचे नुकसान झाले असून शहरालगतच्या भागातील खिंडीवरील पूल वाहून गेल्याने लगतची शेत जमीन वाहून गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच वाशी शहरातील जुन्या बसस्थानकामागील बायपास रस्त्यावर असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याच रस्त्यावर असलेल्या दिशा कलेक्शन या कपड्यांचे मोठे शोरुम असलेल्या दुकानाच्या तळघरात पाणी शिरल्याने साडी विभागाचे खूप मोठे नुकसान झाले.या दुकानाचे मालक समीर जाधव-पाटील यांनी सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे वाहून गेलेला पूल काही काळापूर्वीच बांधण्यात आला आहे.