तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत, तुळजापूर येथे 108 फूट उंचीचे भव्य ब्राँझ धातूचे शिल्प उभारण्यात येणार आहे. हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांना श्री तुळजाभवानी देवी आशीर्वाद देत असलेल्या प्रसंगावर आधारित असणार आहे. या शिल्पाच्या मूळ आराखड्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली 2.5 ते 3 फूट उंचीच्या फायबर मॉडेल्स मागविण्यात आली आहेत.
अनुभवी शिल्पकारांना संधी
सदर फायबर मॉडेल तयार करण्यासाठी इच्छुक शिल्पकारांकडे शिल्पकलेतील पदवी अथवा पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय किमान 15 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे अपेक्षित आहे. तयार करण्यात आलेल्या फायबर मॉडेल्समधून एकूण 5 मॉडेल्सची निवड निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक मॉडेल सादरकर्त्याला 1.5 लाख रुपये इतके मानधन देण्यात येईल.
तसेच अंतिम निवड झालेल्या फायबर मॉडेल सादरकर्त्याला 10 लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. हे मॉडेल ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भांचा विचार करून तयार करणे बंधनकारक आहे. यासाठी शिल्पकारांनी इतिहासकार तसेच पुरातत्व विभागाकडून प्राप्त झालेले संदर्भ अभ्यासून मॉडेल तयार करावे.
मॉडेल सादरीकरणासाठी 1 ते 31 ऑगस्टपर्यंत कालमर्यादा
सदर फायबर मॉडेल्स 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे सादर करावयाची आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी राखून ठेवले आहेत.
या उपक्रमासंदर्भातील अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
<https://dharashiv.maharashtra.gov.in>
<https://shrituljabhavani.org/> श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने कलारसिक शिल्पकारांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.