कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यात वीजबिल मीटर रिडिंग आणि वितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. डीएसपी इलेक्ट्रिकल एजन्सीच्या मनमानी आणि सदोष कार्यप्रणालीमुळे हजारो ग्राहक त्रस्त झाले असून, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. प्राप्त माहितीनुसार, डीएसपी इलेक्ट्रिकल एजन्सीकडून मीटर रिडिंग अत्यंत अनियमितपणे घेतले जात आहे. अनेक ठिकाणी तर अंदाजे रिडिंग घेऊन बिले पाठवली जात आहेत, ज्यामुळे ग्राहकांना भरमसाठ वाढीव रकमेची बिले येत आहेत.
धक्कादायक म्हणजे, काही ठिकाणी चक्क 4-4 महिने बिले दिली जात नाहीत आणि जेव्हा ती येतात, तेव्हा ती एकत्रित असल्याने ग्राहकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. यामुळे कळंब तालुक्यातील हजारो नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. चुकीच्या रिडिंगमुळे शेकडो ग्राहक कळंब कार्यालयाचे उंबरठे झिजवत असले तरी, त्यांच्या समस्यांचे समाधान होताना दिसत नाही.
या गोंधळाचे एक ताजे उदाहरण म्हणजे कळंब शहरातील रहीम मणियार यांना आलेले बिल. त्यांना दर महिन्याला साधारणतः 1 हजार ते दीड हजार रुपये बिल येत असताना, जून महिन्यात त्यांना तब्बल 2 लाख 48 हजार रुपयांचे बिल देण्यात आले आहे. दररोज शेकडो ग्राहक वीजबिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत, परंतु त्यांच्या तक्रारींचे निरसन होत नाही.
डीएसपी एजन्सीकडे तालुक्यातील 27 हजार ग्राहकांचे मीटर रिडिंग घेण्याचे आणि वीजबिल देण्याचे कंत्राट आहे. मात्र, प्रत्यक्षात जागेवर न जाता एका ठिकाणी बसूनच रिडिंग टाकले जात असल्याचे आणि दर महिन्याला लाखो रुपयांची बिले उचलली जात असल्याचे नागरिक सांगतात. नवीन मीटरमुळे वाढत्या बिलांनी नागरिक हैराण असतानाच, एजन्सीचे “काळे धंदे“ कमी होत नसल्याचे बोलले जात आहे. संबंधित कंत्राटदाराला “वरच्या साहेबांचे“ आशीर्वाद असून, मराठवाड्यातील अनेक भागात कंत्राट असल्याने आपले कोणी काही करू शकत नाही, अशा आविर्भावात कंत्राटदार वावरत असल्याची चर्चा आहे.
डीएसपी इलेक्ट्रिकल एजन्सीच्या सततच्या असमाधानकारक कामाबद्दल अनेक तक्रारी करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. या “बोगस“ काम करणाऱ्या एजन्सीला पाठीशी घालणाऱ्या कार्यालयातील संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी यांचा तपास करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन डीएसपी इलेक्ट्रिकल एजन्सीवर कठोर कारवाई करावी, त्यांचा परवाना आणि कंत्राट रद्द करावे, अशी कळंब तालुक्यातील नागरिकांकडून तीव्र मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.