तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील विद्युत साधने विशेषता डीपी, तारा दुरुस्ती कडे गुत्तेदार वर्षानुवर्षे दुर्लक्ष करीत असल्याने याचा परिणाम फ्युज वायरसाठी गेलेल्या ग्रामस्थांना करंट बसुन होत आहे. ग्रामीण भागात डीपीतील फ्युज गेल्यानंतर बसविण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थास वीजेचा धक्का बसुन जीवतहानी झाल्यास संबंधित दुरुस्ती करणारे ठेकेदार व संबधित अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील बहुतांशी गावात डीपी, तारा दुरुस्ती, फ्युज बसवणे याकडे महावितरण अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. वीज ही जीवनावश्यक गोष्ट बनल्याने विद्युत प्रवाह खंडीत होताच लाईनमन येत नसल्याने ग्रामस्थ जीव धोक्यात घालुन फ्युज बसवतात. या प्रकरणी कामठा येथे बुधवार सकाळी वीज प्रवाह खंडित होताच एक ग्रामस्थ डीपीतील फ्युज बसविण्यासाठी गेला असता असता मेनलाईन वरुन आलेल्या वायर उघड असल्याने त्यास स्पर्श होताच वीजेचा करंट बसुन एक ग्रामस्थ बालबाल बचावला. सध्या तालुक्यातील बहुतांशी गावातील डीपी अनेक वर्षापासून दुरुस्ती केल्या जात नाहीत. आजुबाजुला झाडेझुडपे वाढले आहे. डीपी दरवाजे, फ्युज यांची दुरावस्था झाली आहे. डीपी दुरुस्त, तारा दुरुस्ती साठी कोट्यावधी रुपयाचे टेंडर असल्याचे समजते. पण डीपी, तारा दुरुस्ती न करता हा टेंडर,पैसा कुणाचा खिशात जातो असा सवाल होत आहे. डीपी, तारा दुरुस्ती टेंडर वाले कोट्याधीश झाले. पण वीज वितरण व्यवस्था माञ पुर्णता कोलमडले आहे. या दुरुस्ती बाबतीत ना माहीती दिली जाते ना केली जाते. या बाबतीत आंधळ दळतय कुञ पीठ खातय असा कारभार तालुक्यात सुरु आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष हा चर्चा विषय बनला आहे. सध्या महावितरण ठेकेदार मालमाल, महावितरण कंगाल अशी परिस्थिती आहे. महावितरणला ठेकेदार अक्षरशा ओरबडुन खात आहेत. सध्या येथील कार्यालये अधिकारी ऐवजी ठेकेदार चालवत असल्याची चर्चा आहे.