भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील पखरूड येथील वडाचा मळा ते सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर या शेत रस्त्याचे काम अत्यंत दर्जा हीन होत असल्याने ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या आवारात ठिय्या मांडून उपोषण केले.
सध्या तालुक्यात विविध शेत रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, पखरूड परिसरातील या रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत सांगितले की, संबंधित गुत्तेदाराने केवळ कागदावर काम दाखवून 5 लाखांचे बिल उचलले असून प्रत्यक्षात काम फारच थोड्या प्रमाणात व निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
ही माहिती मिळताच गट विकास अधिकारी एल. आर. वाजे यांनी उपोषणकर्त्यांशी संपर्क साधत त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली आणि कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली.
या चर्चेनंतर गट विकास अधिकारी वाजे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत, “कामाची पाहणी करून जर ते निकृष्ट दर्जाचे आढळले, तर संबंधित गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल,“ असे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले. मात्र ग्रामस्थांचा इशारा: जर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई झाली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन पंचायत समितीच्या आवारात छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.