उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील आनंदीपुर आर्य समाज भवनात श्रावणी पर्व सोहळ्याचे आयोजन रविवार दि. 27 जुलै ते 31 जुलै पर्यंत आयोजित करण्यात आले असून या सोहळ्यात चार यजमानांना यज्ञ सोहळ्यात सहभागी करण्यात आले होते.
वेद हे जगातील प्राचीन ग्रंथ आहे, जगातील सर्व ज्ञानाचा मुळ उगम हा वेदात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वेदातील सर्व ज्ञान विज्ञानाधिष्ठीत आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञानातील सर्व कसोट्यांवर ते सत्यात उतरते. त्यामुळे सद्य परिस्थितीत मानवाच्या सर्व समस्यांचे समाधान व जगताच्या कल्याणाचे सुञ हे वेदात मिळते. त्यामुळे उपस्थित सर्वांनी “यज्ञो वै श्रेष्ठतम कर्म“ हे ब्रीद वाक्य घेऊन यज्ञ सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे रविवार दि. 27 रोजी पासून पाच दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी पञकार लक्ष्मण पवार व पत्नी भक्ती लक्ष्मण पवार यांना मुख्य यजमान व त्यांना सोबतीला यजमान म्हणून सपत्नीक संजय माने, सपत्नीक मिलींद पुदाले, सपत्नीक राजेंद्र माने यांनी यज्ञ सोहळ्यात सहभागी होऊन वैदिक धर्म, राष्ट्रधर्म, संस्कृती रक्षण व सर्वांगीण आरोग्य या विषयावर प्रवचन व भजन कार्यक्रमाचा आनंद घेतले.
या वेळी यज्ञ, प्रवचन व भजन कार्यक्रम राजस्थान राज्यातील हनुमानगढ येथील आचार्य पं. नारायणसिंह आर्य व बरेली उत्तरप्रदेश येथील भजनोपदेशक पं. जितेंद्रदेव आर्य व सुरेंद्र आर्य यांनी मंञोच्चारण कार्य पार पाडले. यज्ञ सुरू होताच गायञी मंञ पठण करण्यात आले. सदर कार्यक्रम दोन सञात चालू केले आहे. सकाळी 8:30 ते 10:30 यावेळी यज्ञ, प्रवचन व भजन तर सायंकाळी 5:30 ते 8:30 यावेळी पारिवारिक सत्संग सोहळा सुरू आहे. या श्रावणी पर्व सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन विठ्ठल जाधव गुरूजी, प्रदीप चालुक्य, माधवराव माने, कर्णसिंह गौतम, प्रा. शैलेश महामुनी, सुरेंद्र वाले, बाळासाहेब माने यांनी केले आहेत.