भूम (प्रतिनिधी)- भूम शहर आणि तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने शनिवारी 26 जुलै रोजी मुसळधार रूप धारण केले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून भूम शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.येथील आरसोली मध्यम प्रकल्प , रामगंगा मध्यम प्रकल्प , गोरमाळा साठवण तलाव ओसाडून वाहत आहेत .
आरसुली मध्यम प्रकल्प भरल्यामुळे भूम शहराचा व वाशी शहराचा पाणी प्रश्न मिटला असून 6 गावांचा पिण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
कालपासून चालू असलेले पावसाने भूम दरेवाडी सावरगाव बार्शी ,माणकेश्वर बार्शी हे मार्ग वाहतुकीसाठी बंध आहेत.सावरगाव ते दरेवाडी या नदीवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आढळून आला आहे, तर बेदरवाडी गावाजवळील नदीवरून पाणी पुलावरून वाहत असल्याने नागरिकांची ये-जा पूर्णपणे थांबली आहे. भूम शहरातील कसबा भागातील लेंडी नदीतही पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढला असून ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली आहे. पावसाचा तडाखा ओळखून भूम शहरातील शाळा वेळेआधी सुटल्या, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी पावसामुळे शाळेत जाणे टाळत आहेत. नदी-नाल्यांचा पाण्याचा प्रभाव एसटी बससेवांवरही दिसून आला असून काही बसगाड्या पर्यायी मार्गाने सोडण्यात आल्या आहेत. मौसम विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.