तुळजापूर (प्रतिनिधी)- कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत सॅस्कॅचवॉन (कॅनडा) येथे अभ्यास दौरा दिनांक 15 ते 17 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यामुळे भारत आणि कॅनडा मधील कृषी, विशेषतः कडधान्य पिकांच्या क्षेत्रात, नव्या तांत्रिक आणि औद्योगिक सहकार्याच्या संधी खुल्या होऊ शकतील. तसेच उत्पादन, प्रकिया व निर्यात साखळी मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये भविष्यातील सहकार्य होणार असल्याची माहिती इंडो पल्सेस डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष नारायण नन्नवरे यांनी यावेळी बोलताना दिली.
साल 2025, फार्म एक्सपो या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शिष्टमंडळाची रचना करण्यात आलेली होती. या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनास भारतातील शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी जीवन बोन्डे, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. दीपक खंडेराव पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ (कडधान्य पैदासकार), कृषी संशोधन केंद्र, बदनापूर हे उपस्थित होते. तसेच, इंडो पल्सेस डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष नारायण नन्नावरे, उपाध्यक्ष बालाजी ढोबे, व जयंत वैद्य हे अभ्यास दौऱ्यासाठी उपस्थित होते.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रतिनिधीही या दौऱ्यात सहभागी होते.दौऱ्यात कॅनडा मधील प्रमुख ठिकाणांना भेटी देण्यात आल्या यामध्ये ऍग इन मोशन 2025 फार्म एक्स्पो, सॅस्कॅचवॉन या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात आधुनिक कृषी यंत्रसामग्री, स्मार्ट तंत्रज्ञान, हवामान बदलाचे व्यवस्थापन, शेतीतील नवकल्पना, कृषी प्रक्रिया उद्योगातील प्रगत तंत्रे आणि जागतिक व्यापार संधी यांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
त्याचं बरोबर सॅस्कटून क्लब हाऊसमध्ये कॅनडाच्या व्यापार व निर्यातमंत्री वॉरेन काईडींग यांच्याशी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. IPDA च्या सदस्यांनी महाराष्ट्रात प्रोटीन आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी कॅनडाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच इंनोवाशन संस्कारचेवाण या संस्थेच्या रिनाता बेरेझीक (एक्सएकटीव्ह डायरेक्टर इंटरनॅशनल एंगेजमेंट) यांनी सॅस्कॅचवॉन प्रांतातील औद्योगिक, तांत्रिक व व्यापार संधींचे सादरीकरण केले आणि भारतातील अभ्यासदौऱ्यातील प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.त्याच बरोबर ग्लोबल इन्स्टिटयूट ऑफ फूड सेक्युरिटी (गिफ्स) व युनिव्हर्सिटी ऑफ संस्कारचेवाण येथे शिष्टमंडळाने भेट दिली व अभ्यासपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर कंट्रोल्ड एनविरोनमेंट फॅसिलिटी (फयतोट्रॉन) येथे वातावरणातील बदल व त्याचा पिकांवर होणारा परिणाम यावर चालणाऱ्या संशोधनांची माहिती घेतली.
तसेच सिक्सटीन ग्रेन्स इनक संचालित यांत्रिक शेतीला भेट दिली या शेतकरी कंपनीच्या 8500 एकर क्षेत्रावरील यांत्रिक शेतीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरणाच्या संधी व क्षमता याचा अनुभव घेतला त्याचं बरोबर संस्कारचेवाण युनिव्हर्सिटी मधील शास्त्रज्ञांशी बियोफोर्टिफिकेशन इन पल्सेस व प्रोटीन इसोलेशन यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या संधींची मांडणी करण्यात आली.