लोहारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील लोहारा (खुर्द) गावाला गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्याचा जबर फटका बसला. या नैसर्गिक संकटात गावातील अनेक घरांची पत्रे उडून गेली. वीज रोहित्रांसह विद्युत खांब कोसळले, झाडे उन्मळून पडली. लोहारा-माकणी रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.

दुपारी साडेतीनच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला. 

आकाशात गडगडाट सुरू झाला आणि बघता बघता वाऱ्याचा जोर इतका वाढला की लोहारा (खुर्द) संपूर्ण गाव हादरून गेले. जवळपास पंधरा मिनीट वादळ घोंगवत होते. या वादळात अनंत आरगडे, बाळू पवार यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे पूर्णपणे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसंत रसाळ यांच्या घरावर बाभळीचे झाड पडल्याने घराची मोठी हानी झाली. पावसापूसून संरक्षण व्हावे, यासाठी कडब्यांच्या गंजीवर ठेवलेले पत्रे पत्रवाळीसारखे उडून गेले. प्रमुख रस्त्यावरील 12 पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे गावाला व परिसरातील शेतशिवारांना वीजपुरवठा करणारे दोन महत्वाची रोहित्र पूर्णपणे जमिनीवर कोसळले. तर अनेक ठिकाणचे विद्युत खांबही उन्मळून पडले. परिणामी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, वादळात लोहारा-माकणी मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड उन्मळून पडल्याने एकतास वाहतुक ठप्प झाली. यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

 
Top